बारामती – प्रवासी वाहतूक ठप्प असल्याने बारामती (एमआयडीसी) एसटी आगारातून मालवाहतूक सुरू करण्यात आली आहे. उत्पन्न वाढवण्याचा नवीन प्रयोग एसटीकडून होताना दिसत आहे. एसटीच्या या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असून. एमआयडीसी एसटी आगाराला तीन दिवसांत 30 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्या भिवंडी, पुणे येथे मालवाहतूक सुरू असून मागणीनुसार संपूर्ण राज्यात मालवाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख गोविंद जाधव यांनी दिली.
प्रवासी वाहतूक ठप्प असल्याने मालवाहतूक करून उत्पन्न वाढवण्याठी बारामती एसटी आगाराचे प्रयत्न सुरू आहेत. करोनाच्या वैश्विक महामारीचा फटका एसटीला मोठ्या प्रमाणात बसला आहे. प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यातूनच मालवाहतुकीस चालना दिली जात आहे. बारामती एमआयडीसी एसटी आगारातून चार एसटी ट्रकच्या साह्याने मालवाहतूक केले जात आहे. बारामती येथून पहिला मालवाहतूक ट्रक भिवंडी येथे पाठवण्यात आला.
मालवाहतुकीस प्रतिसाद मिळावा यासाठी एसटीच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी बारामती एमआयडीसीतील कंपन्यांशी संपर्क साधला जात आहे. तर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेतमालाची वाहतूक एसटीच्या मालवाहतूक गाडीतून व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
एसटीच्या मालवाहतूक ट्रकमधून वाहतूक करावी प्रयत्न केले जात आहेत. त्यासंदर्भात येथील व्यापारी महासंघाबरोबर चर्चा झाली आहे. संपूर्ण राज्यात एसटीचे 250 डेपो 600 बस स्थानक आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात सेवा पोहोचविण्यात कोणताही अडसर येणार नाही. एसटीच्या मालवाहतुकीला वेगळी विश्वासार्हता असेल व दरही माफक आहे. त्यामुळे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल
– गोविंद जाधव, एसटी आगार प्रमुख, बारामती एमआयडीसी