पुणे – गेल्या काही वर्षांच्या कालावधीत एसटी महामंडळामध्ये तोतया कर्मचाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. हे तोतये कर्मचारी असल्याचे भासवून एसटीच्या बसने फुकट प्रवास करत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. या संदर्भात बहुतांशी वाहकांनी संबंधित आगार प्रमुखांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. त्याची गंभीर दखल महामंडळाच्या मुख्य कार्यालयाने घेतली आहे. त्यामुळे यापुढील कालावधीत या वाहकांना प्रवास करताना चालू महिन्याची पगार स्लिप आणि एसटी महामंडळाचे ओळखपत्र दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्य कार्यालयाने सर्व विभागांना दिले आहेत.
तोतयांना जबर बसावी म्हणून एसटी बसमध्ये बसताच संबंधित कर्मचाऱ्याला आता वाहक असल्याची आपली ओळख पटवून द्यावी लागणार आहे. त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला वाहकाला चालू महिन्याची पगार स्लिप, एसटी महामंडळाचे ओळखपत्र आणि वाहकाने मागणी केल्यास आधारकार्ड दाखवावे लागणार आहे. ही कागदपत्रे नसल्यास तो महामंडळाचा कर्मचारी असला तरीही त्याला मोफत प्रवास करता येणार नाही. अशा प्रवाशांच्या विरोधात थेट पोलिसांत तक्रार करा, अशा सूचना सर्व वाहकांना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय वाहकाने त्यामध्ये कसूर केल्यास आणि तिकीट तपासणीसावेळी ही बाब निदर्शनास आल्यास संबंधित वाहकांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना तिकीट तपासणीसांना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी आल्या होत्या. त्याची खातरजमा केल्यानंतर त्यामध्ये तथ्य असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढील कालावधीत अशा प्रवाशांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.