मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील तरुण आणि हरहुन्नरी अभिनेता ‘सुशांत सिंग राजपूत’ने वयाच्या 34 व्या वर्षी मुंबईतील (14 जून 2020) आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते.
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात वर्षभरानंतरही अनेक खुलासे होत आहेत. काही दिवसांपासून सुशांतचे निकटवर्तीय असलेले अनेक जण साक्षीदार होण्यासाठी पुढे आले आहेत. गेल्या आठवड्यात सुशांतचे नोकर नीरज सिंग आणि केशव बचनेर हे दोघे साक्षीदार झाले.
तर काल सुशांतचा बॉडीगार्ड सागर सोहिल साक्षीदार झाला. तसेच येत्या काही दिवसात सुशांतचे काही मित्रही साक्षीदार होण्यासाठी पुढे येण्याची शक्यता आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी मालाडमध्ये एका ठिकाणी सागरचीअनेक तास चौकशी केली. ही चौकशी मध्यरात्रीपर्यंत चालली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा हळूहळू अनेक जणांची चौकशी होणार असल्याचे देखील समजले जात आहे.
सुशांत सिंग राजपूत हा पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहचला होता. तर त्याने हिंदी सिनेसृष्टीत काय पो छे, पीके, शुद्ध देसी रोमान्स, छिछोरे अशा सिनेमांधूनही काम केलं होतं. त्याच्या आत्महत्येमुळे संपूर्ण हिंदी सिनेसृष्टी हादरली.