एसएससी बोर्डाची मुले गुणवत्तेत मागे पडणार?

टक्‍का घटला : दहावीच्या निकालानंतर चर्चा; सीबीएसई, आयसीएसई बोर्डांची आघाडी
एसएससी बोर्डाची मुले गुणवत्तेत मागे पडणार?

पुणे – सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय बोर्डांच्या इयत्ता दहावीचा निकाल अनुक्रमे 91 टक्‍के, तर 98 टक्‍के इतका आहे. परंतु महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल केवळ 77.10 टक्‍के इतका लागला आहे. तुलनात्मक विचार करता राज्य शिक्षण मंडळाच्या निकालापेक्षा केंद्रीय बोर्डाचा निकाल अनुक्रमे तब्बल 14 आणि 21 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाबरोबर अन्य पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एसएससी बोर्डाची मुले गुणवत्तेत मागे पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

यंदा बोर्डाचा तब्बल 12 टक्‍क्‍यांनी निकाल घटला आहे. मात्र, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यंदा राज्यात सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचा निकाल यापूर्वीच जाहीर झाला. या केंद्रीय बोर्डांचा निकाल यंदा सर्वात चांगला असून, त्यांचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत वाढला आहे. त्यामुळे त्या बोर्डातील मुलांची उत्तीर्णतेची टक्‍केवारी आपोआप वाढली आहे. त्याचा फटका महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना बसण्याची भीती आहे.

यंदा दहावीचा “नवीन अभ्यासक्रम’, “तोंडी परीक्षेतील गुणांची खैरात बंद’, “नवीन परीक्षा पद्धतीमुळे निकाल घटला’, असे बोर्डाचे म्हणणे आहे. याउलट सीबीएसईसह अन्य केंद्रीय बोर्डाचे निकाल वाढत आहेत. त्याचा नकळत परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर होणार हे स्पष्ट आहे. सीबीएसई दहावीचा देशाचा निकाल 91.1 टक्‍के आहे. मात्र, विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचा समावेश असलेल्या सीबीएसई चेन्नई विभागाचा निकाल 99 टक्‍के इतका लागला आहे. त्याचाच अर्थ सीबीएसई बोर्ड संलग्नित महाराष्ट्रातील मुलांना चांगले गुण मिळाले आहेत.

दरम्यान, सीबीएसई बोर्डातील बहुतांश दहावी उत्तीर्ण मुले अकरावीसाठी त्यांच्या बोर्डातील महाविद्यालयांना प्राधान्य देतात. या बोर्डाची कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे ही सर्व मुले अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत सहभागी होतात. परिणामी, या बोर्डाच्या मुलांना गुण चांगले असल्याने, त्यांना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.