लंडन – ब्रिटीश राजघराण्यातील राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि त्यांच्या पत्नी मेघन मर्केल यांना आज पुत्ररत्न प्राप्त झाले. मेघन मर्केल यांनी स्थानिक वेळेनुसार पहाटे साडे पाचच्या सुमारास मुलाला जन्म दिला असून बाळ सुदृढ असल्याचे प्रिन्स हॅरी यांनी पत्रकारांना सांगितले.
“ही अतिशय आनंदाची आणि अभिमान वाटावी अशी गोष्ट आहे. मला माझ्या पत्नीचा अतिशय अभिमान वाटतो आहे. प्रत्येक पित्याला जसे आपले बाळ जीवापेक्षा जास्त प्रिय असू शकेल, तसेच माझे बाळही माझ्यासाठी प्रिय आहे. मला जणू काही चंद्रावर असल्यासारखेच वाटायला लागले आहे.’ अशा शब्दांमध्ये प्रिन्स यांनी आपला आनंद व्यक्त केला. बाळाचा जन्म होण्यास थोडा उशीर झाला असल्याचे त्यांनी मान्य केले, राजघराण्यातील या नव्या पाहुण्याचे नाव काय ठेवायचे हे हॅरी आणि मर्केल यांनी अद्याप ठरवलेले नाही.
राजघराण्यातील नवीन वारसाचा जन्म झाल्याबद्दल ब्रिटनवासियांकडून राजदाम्पत्यावर अभिनंदनाचा वर्षाव व्हायला लागल आहे. या सर्व शुभेच्छांचा हॅरी यांनी स्वीकार केला आणि सर्वांना मनापासून धन्यवादही दिले आहेत. हॅरी आणि मेघन मर्केल यांच्या मुलाच्या जन्माने राजघराण्याला राजेपदासाठी सलग सातवा वारसदार मिळाला आहे. महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांच्यासाठी हा आठव्या पणतू आहे. युवराज चार्ल्स, राजपुत्र विल्यम्स, त्यांची मुले प्रिन्स जॉर्ज, प्रिन्सेस कॅरलोट आणि प्रिन्स ल्युईस यांच्यानंतर प्रिन्स हॅरी हे राजघराण्याचे वारसदार असणार आहेत.