पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून लढत असलेले शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात नाराजी होती. संजोग वाघेरे पुढे होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम केल्यानेच बारणे विजयी झाले आहेत.
हे निकालावरुन स्पष्ट झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी केला. तर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी काम केले असते तर बारणे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली असती, या विधानाला प्रत्युत्तर देत त्यांचे वक्तव्य केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी होते, असेही पार्थ पवार म्हणाले.
पार्थ पवार यांनी मंगळवारी (दि.13) चिंचवडमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी अनेक विषयांचा खुलासा केला. लोकसभा निवडणुकीबाबत पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले.
खासदार श्रीरंग बारणे यांनी माध्यमांसमोर काहीही सांगितले असले तरी माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे काम केले. हे त्यांच्या मुलाला म्हणजे विश्वजीत बारणे याला माहिती आहे.
यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, अॅड. गोरक्ष लोखंडे, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, फजल शेख आदी उपस्थित होते.
पद घेणार नाही, निवडणूक लढविणार नाही
पिंपरी चिंचवड शहरात अधिक लक्ष घालत असल्याबाबत पार्थ पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरात मी नेहमीच सक्रिय होतो.
पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत पक्षकार्य करण्यासाठी मी पक्षाचे कोणतेही पद घेणार नाही अथवा कोणतीही निवडणूक लढविणार नाही.
पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अनेकजण पक्ष सोडून गेले आहेत. विधानसभा निवडणूक जवळ आहे. लोक आपल्यासोबत आहेत की नाही, नाराजी आहे का, काय नाराजी आहे. याची माहिती घेत आहे. लोकांशी संवाद साधत आहे, असे ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवडला राज्यपाल नियुक्त आमदार मिळावा
शहराध्यक्षाच्या निवडीबाबत ते म्हणाले, शहराध्यक्ष हे एक पद आहे. आमच्यासाठी पक्षातील सर्व वरिष्ठ नेते शहराध्यक्षच आहेत.
शहराध्यक्षपदाबाबतचा अंतिम निर्णय अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे घेतील. तर पिंपरी-चिंचवड शहराला राज्यपाल नियुक्त आमदार मिळावा, अशी माझी भूमिका आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सध्या तरी अण्णाच पिंपरीचे उमेदवार
विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शहरातील अनेक इच्छुक राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असल्याबाबत विचारले असता, ते म्हणाले त्यांना आपण रोखू शकत नाही. पिंपरी विधानसभेतून सध्या तरी अण्णा बनसोडे हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असेही त्यांनी सांगितले.
तर चिंचवड विधानसभेबाबत बघू असे म्हणत या मतदार संघातील उमेदवाराची सस्पेन्स वाढविला आहे. तर बारामतीमधून युगेंद्र पवार यांना शरद पवार हे उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अजित गव्हाणे यांचा निर्णय चुकीचा
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद सोडून शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलेले अजित गव्हाणे यांच्या पक्षांतराबात ते म्हणाले की, अजित गव्हाणे यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे. सध्यातरी परिस्थिती वाटत नसल्याने ते भोसरीमधून निवडून येतील असे मला वाटत नाही.