श्रीनिवास पाटील, पृथ्वीराजबाबांनी जिल्ह्यासाठी काय केले?

उदयनराजे भोसले यांचा सवाल : शेवटच्या श्‍वासापर्यंत विकासाला प्राधान्य

सातारा – श्रीनिवास पाटील यांनी दोन वेळा खासदारकी, राज्यपालपद भूषवले, पृथ्वीराजबाबांकडे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्रिपद, खासदारकी होती, एवढेच नव्हे तर ते मुख्यमंत्रीही होते. एवढी मोठी पदे असताना त्यांनी जिल्ह्यासाठी काय केले? असा प्रश्‍न सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी विचारला. जिल्ह्यातील जनतेच्या विकासासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत कार्यरत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

येथील कल्याण रिसॉर्ट येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या सहविचार सभेत ते बोलत होते. महायुतीचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महेश शिंदे, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील कदम, सुनील काटकर, सुनील सावंत, रवी साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य अर्चना देशमुख, भाग्यश्री मोहिते, गीतांजली कदम, संदीप शिंदे, प्रवीण धस्के, रेश्‍मा शिंदे, विजय काळे, सयाजीराव पाटील, अलका बोभाटे, समृद्धी जाधव, सतीश माने, नानासाहेब शिंदे, रमजान मुलाणी उपस्थित होते. उदयनराजे म्हणाले, मी ज्यांच्याबरोबर यापूर्वी काम केले त्यांनी माझा वापर केवळ

नावासाठी करून घेतला. प्रत्येक वेळी अडचणी निर्माण करण्यात आल्या तरीदेखील मी सातारा जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य दिले. मी काय विकास केला, असे आ. पृथ्वीराज चव्हाण व श्रीनिवास पाटील विचारतत आहेत. त्यांना माझे सांगणे आहे की, पृथ्वीराजबाबा तुम्ही पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, खासदार व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता, मग जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही काय केले? ते सांगून मगच माझ्यावर टीका करा. श्रीनिवास पाटील हे दोनदा खासदार होते, सिक्‍कीमचे राज्यपाल होते.

एवढी मोठी पदे असताना असताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासात काय योगदान दिले? याउलट मी जिल्ह्यातील विविध प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सलग तीन वेळा जनतेने मला विजय केले. यावेळीही जनतेची साथ निश्‍चितच मिळेल.

आज मी जो काही आहे, त्याचे सर्व श्रेय जनतेला आहे. मी नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले आहे, मात्र, कॉंग्रेस-राष्ट्रवादीने चुकीच्या पद्धतीने राजकारण केले. कृष्णा खोऱ्याचा प्रश्‍न त्यांना मार्गी लावता आला नाही. त्यामुळे आजही अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती आहे. तरुण पिढी विकासापासून वंचित ठेवण्याचे काम करत मूठभर लोकांनी स्वार्थ साधला. शेतकऱ्यांच्या मालकीचा जरंडेश्‍वर कारखाना त्यांनी गिळंकृत केला. तरुण पिढीचे आयुष्य वाया जाऊ देणार का, याचा विचार आपण करणे गरजेचे आहे. जिथे अन्याय होतो, तिथे मी धावून जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आज देशात, राज्यात वेगळे चित्र निर्माण झाले आहे. यावेळी सातारा जिल्ह्यातही वेगळे चित्र दिसणार आहे.

एक वेळ पुन्हा संधी द्या, एक वर्षात जिल्ह्याच्या विकासात बदल घडवून आणतो, असे आश्‍वासन उदयनराजे यांनी दिले. महेश शिंदे म्हणाले, जिल्ह्यात महायुतीची लाट असून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. भाजप व मित्रपक्षांचे उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने विजयी होतील. समृद्धी जाधव, सुनील काटकर, संदीप शिंदे, गीतांजली कदम, प्रवीण धस्के यांनी मनोगत व्यक्‍त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.