#CWC19 : श्रीलंकेचा वेस्ट इंडिजवर 23 धावांनी विजय

चेस्टरलेस्ट्रीट – सामन्यात पराभव पत्करावा सन्मानानेच याचा प्रत्यय वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरन (118) व फॅबियन ऍलन (51) यांनी घडविला. त्यांनी तडाखेबाज फलंदाजी केली. मात्र, श्रीलंकेने त्यांच्यावर 23 धावांनी विजय मिळविला. विजयासाठी 339 धावांचे आव्हानास सामोरे जाताना वेस्ट इंडिजने 50 षटकांत 9 बाद 315 धावा केल्या.

लसिथ मलिंगाने सुनील ऍम्ब्रीस व शाय होप यांना झटपट बाद केल्यानंतर ख्रिस गेल व शिमोरन हेटमेयर यांनी 49 धावा जमविल्या. लागोपाठ दोन षटकार ठोकून गेल याने आक्रमक पवित्रा घेतला. मात्र, तसा प्रयत्न करताना त्याने 35 धावांवर विकेट गमावली. हेटमेयर याला सूर सापडला असे वाटत असतानाच धावबाद झाला. त्याने 29 धावा केल्या. पूरन व कर्णधार जेसन होल्डर यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्याचबरोबर त्यांनी धावांचा वेगही वाढविण्यावर भर दिला. ही जोडी स्थिरावत असतानाच होल्डर 29 धावांवर बाद झाला.

न्यूझीलंडविरूद्ध झंझावती शतक टोलविणाऱ्या कार्लोस ब्रेथवेटकडून त्याच कामगिरीची अपेक्षा होती. त्याच्या साथीत पूरन याने 54 धावांची भागीदारीही केली. त्यामध्ये ब्रेथवेटचा 8 धावांचा वाटा होता. ऍलन व पूरन यांची जोडी झकास जमली. षटकामागे 8 ते 10 धावांचा वेग ठेवीत त्यांनी लंकेची गोलंदाजी फोडून काढली. त्यांनी 83 धावांची भागीदारी केली. ऍलनने 7 चौकार व एक षटकारासह 51 धावा केल्या. पूरन याने धडाकेबाज खेळ करीत 103 चेडूंमध्ये 118 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 11 चौकार व 4 षटकार मारले. तो असेपर्यंत विंडीजला विजयाच्या आशा होत्या. परंतु अँजेलो मॅथ्युजने 48 व्या षटकात त्याला बाद करीत संघाचा विजय सुकर केला.

#CWC19 : श्रीलंकेचे वेस्टइंडिजसमोर 339 धावांचे लक्ष्य

संक्षिप्त धावफलक-

श्रीलंका 50 षटकांत 6 बाद 338 (अविष्का फर्नांन्डो 104, कुशल परेरा 4, कुशल मेंडिस 39, जेसन होल्डर 2-59)

वेस्ट इंडिज 50 षटकांत 9 बाद 315 (निकोलस पूरन 118, फॅबियन ऍलन 51, ख्रिस गेल 35, लसिथ मलिंगा 3-55)

Leave A Reply

Your email address will not be published.