मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर देखील गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
“ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीस माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी श्रीकांत शिंदेंकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण पाहता हा विषय आपल्या निदर्शनास आणणे आवश्यक आहे’. असं राऊत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. सध्या सगळीकडे त्यांचं हे पत्र चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या या पत्राला आता स्वतःला मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी श्रीकांत शिंदे हे एका कार्यक्रमात माध्यमांशी सवांद साधत असताना त्यांनी या पत्रावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले, “संजय राऊत यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात तफावत आहे. सामनाचे उपसंपादक चिंदरकर यांच्या माहितीवर आधारीत आरोप संजय राऊत यांनी केले आहेत. पण चिंदरकर यांनी दिलेल्या जबाबात त्यांनी कोणाचेही नावन घेता संजय राऊत यांना काळजी घेण्यास सांगितलं, असा जबाब दिलाय,’ असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘मला राऊत साहेबांची खूप काळजी वाटते. संजय राऊत यांना सिजो फ्रेमिया सारखा आजार जालाय का? असा संशय येऊ लागला आहे. संजय राऊत काल्पनिक गोष्टी बोलत आहेत. ते सकाळी-सकाळी मनोरंजन करतात. तब्येतीची काळजी घ्या, पाहिजे तर मी डॉक्टर सुचवतो,’ असा टोला देखील श्रीकांत शिंदे यांनी यावेळी लगावला.
संजय राऊत आपल्या पत्रात नेमकं काय म्हणाले, वाचा….
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे हटविण्यात आली. याबाबत मी आधीच आपल्याला कळविले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळविले आहे.
आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे की, ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, ‘सामना’चा कार्यकारी संपादक, शिवसेना नेता असलो तरी एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपणास देत आहे.!