पुणे, – श्री रामजी संस्थान तुळशीबाग यांच्या वतीने महाराष्ट्रात प्रथमच प्रभू श्रीराम आणि श्री सीतामाई यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा विवाह सोहळा मार्गशीर्ष शुद्ध पंचमी म्हणजेच दि. ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांनी श्रीराम मंदिर तुळशीबाग येथे होणार आहे, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले यांनी दिली.
भक्त कल्याणार्थ हा विवाह सोहळा करण्यात होणार आहे. श्री सीता रामचंद्र विवाह सोहळा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि आनंददायी उत्सव आहे. हा सोहळा भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या विवाहाची आठवण म्हणून साजरा केला जातो. हा दिवस धर्म, नीती, आणि कर्तव्याचे प्रतीक आहे.
भगवान राम आणि माता सीता यांचा विवाह वैदिक परंपरेनुसार झाला होता, जो भारतीय विवाहसंस्थेचा आदर्श मानला जातो. श्रीराम हे धर्माचे प्रतीक असून माता सीता या श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक आहेत, त्यामुळे त्यांचा विवाह भक्तांसाठी आदर्श सहजीवनाचा संदेश देतो, असे तुळशीबागवाले म्हणाले.