बंगळूरू : येथील सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या (का) विरोधातील निदर्शनात पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा दिल्याच्या कथित आरोपावरून अटक केलेल्या अमुल्या लिओना नऱ्होना या युवतीची हत्या करणाऱ्यास तब्बल दहा लाखाचे इनाम श्रीरामसेना या उजव्या दहशतवादी संघटनेने जाहीर केले आहे.
पत्रकारितेची विद्यार्थीनी असणाऱ्या अमुल्या हिला गेल्या आठवड्यात का विरोधातील निदर्शनावेळी पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा दिल्याबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ही निदर्शने आमची राज्य घटना वाचवा या नावाखाली आयोजित करण्यात आली होती. तिला ठार मारण्यासाठी दहा लाख रुपयांचे इनाम जाहीर करूनही पोलिसांनी श्रीरामसेने विरोधात अद्याप कोणताही गुन्हा दाखल केला नाही.
बेल्लारी येथील श्रीराम सेनेचा नेता संजीव मराडी याने या हत्यसाठी दहा लाख रूपयांचे इनाम जाहीर करत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात, या विद्यार्थीनीला जामीन मिळू नये म्हणून आम्ही सरकारला विनंती करत आहोत. तिने पाकिस्तान झिंदाबाद म्हटले असल्याने तिला सोडू नये. तिला जामीन मिळाल्यास चकमकीत तिची हत्या करणाऱ्यास आम्ही दहा लाखाचे बक्षीस जाहीर करत आहोत.
या युवतीची हत्या करण्याची जाहीर चिथावणी करणाऱ्या माराडीविरोधात अद्याप बेल्लारी पोलिसांनी कोणतीही कारवाई सुरू केली नाही. “”आम्हाला घाईगडबडीत कोणतीही कारवाई करायची नाही. त्याचे एका पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याचे कळले आहे. आम्ही ते व्हिडिओ हस्तगत करण्याच्या प्रयत्नात आहोत, त्यामुळे आम्ही अद्याप एफआयआर नोंदवली नसल्याचे बेल्लारीचे जिल्हा पोलिस अधीक्षक सीके बाबा यांनी सांगितले.