कोलोंबो- श्रीलंकेचे नवीन अध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांच्यावरील भ्रष्टाचाराचे सर्व आरोप आज उच्च न्यायालयाने रद्द केले. राजपक्षे यांना विदेश प्रवासास घातलेली बंदीही न्यायालयाने उठवली. राजपक्षे यांच्या पासपोर्टवरील स्थगितीही न्यायालयाने उठवली.
महिंदा राजपक्षे यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी
श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांचे बंधू आणि माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचा आज देशाचे प्रधानमंत्री म्हणून शपथविधी झाला. विद्यमान पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी त्यांच्या पक्षाचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याने महिंदा राजपक्षे यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवली गेली.
रविवारी जाहीर झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालामध्ये राजपक्षे यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी सजित प्रेमदास यांचा तब्बल 13 लाख मतांनी पराभव केला. राजपक्षे यांच्यावर तब्बल 1,85,000 डॉलर्च्या अपहाराचे आरोप होते. माजी संरक्षण सचिव असलेल्या राजपक्षे यांनी श्रीलंकेत दीर्घकाळ सुरू असलेली यादवी समाप्त करण्याच्या दृष्टीने महत्वाची कामगिरी बजावली होती.
देशाचे सातवे अध्यक्ष म्हणून त्यांनी आज सूत्रे स्वीकारली. त्याबरोबर पश्चिमेकडील प्रांताततील बार येथील “पर्मनंट हाय कोर्ट ट्रायल’ने त्यांच्याविरोधातील विदेश प्रवासाची बंदी उठवली आणि स्थगित केलेला पासपोर्टही खुला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निमंत्रणावरून राजपक्षे 29 नोव्हेंबरला भारत भेटीवर येत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये राजपक्षे यांच्यासह त्यांचे धाकटे बंधू, माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे आणि सहा जणांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणी विदेशात जाण्यास बंदी घातली होती.