#ICCWorldCup2019 : विश्‍वचषकासाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा

मलिंगाला कर्णधारपदावरुन हटवले; दिमुथ करुणारत्नेकडे कमान

कोलंबो  -विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा करण्यात आली असून वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची श्रीलंकेच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याच्या जागी कसोटी कर्णधार दिमूथ करुणारत्नेकडे विश्‍वचषकासाठी नेतृत्वाची धुरा सोपवण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेट मंडळाने घेतला आहे.

करुणारत्नेच्या नियुक्तीचा निर्णय केंद्रीय दूरसंचार, परकीय रोजगार आणि क्रीडामंत्री हरिन फर्नाडो यांनी घेतला आहे, असे श्रीलंका क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे. 31 वर्षीय करुणारत्ने 2015 च्या विश्‍वचषकापासून एकही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याआधी त्याने 17 एकदिवसीय सामन्यांत 15.83 च्या सरासरीने 190 धावा केल्या आहेत. 60 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत श्रीलंकेने 0-5 अशी हार पत्करली होती. त्यावेळी मलिंगाकडे नेतृत्व होते. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतला गेल्याची माहिती मिळत आहे.

श्रीलंका क्रिकेट मंडळाकडे अँजेलो मॅथ्यूजचा कर्णधारपदासाठी पर्याय उपलब्ध होता. परंतु त्याचे प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघे यांच्याशी पटत नसल्यामुळे त्याने हा प्रस्ताव नाकारला होता.

विश्‍वचषकासाठी निवडलेला श्रीलंकेचा संघ :

दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), अविश्‍का फर्नांडो, लहिरु थिरिमाने, कुशल मेंडिस (यष्टीरक्षक), कुशल परेरा (यष्टीरक्षक), अँजेलो मॅथ्युज, धनंजय डीसिल्वा, थिसारा परेरा, इसुरु उडाना, जेफ्री वॅंडेर्से, जिवन मेंडिस, मिलिंदा सिरिवर्दना, लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.