पंतप्रधानपदावर थोरले बंधू महिंदा राजपक्षे यांची अध्यक्षांकडून वर्णी
कोलोंबो- श्रीलंकेतील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये सत्तारुढ युनायटेड नॅशनल पार्टीचा पराभव झाल्यामुळे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला आहे. उद्या (गुरुवारी)आपण आपल्या पदाचा राजीनामा देऊ, असे विक्रमसिंघे यांनी म्हटले होते. परंतू त्यांनी आजच आपले पद सोडून दिले.
श्रीलंकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विक्रमसिंघे यांच्या पक्षाचे उमेदवार सजित प्रेमदासा यांचा गोटाभाया राजपक्षे यांच्याकडून पराभव झाला होता. या पराभवामुळे विक्रमसिंघे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव यायला लागला होता.
विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्यावर राजपक्षे यांनी आपले मोठे बंधू आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधानपदी नियुक्त केले आहे. विक्रमसिंघे यांच्या जागेवर महिंदा राजपक्षे औपचारिकपणे पंतप्रधानपदाची सूत्रे उद्या स्वीकारणार आहेत.
महिंदा राजपक्षे यांना 26 ऑक्टोबर 2018 रोजी तत्कालिन अध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांनी पंतप्रधान म्हणून नियुक्त केले होते. मात्र यामुले श्रीलंकेत अभूतपूर्व घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन महत्वपूर्ण निर्णयांमुळे महिंदा राजपक्षे यांना डिसेंबरमध्ये राजीनामा द्यायला लागले होते. त्यानंतर संसद विसर्जित करण्याचा सिरीसेना यांचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला होता.
महिंदा राजपक्षे वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी खासदार म्हणून निवडून आले होते आणि त्यांनी 2005 मध्ये निवडणुकांमध्ये विजय मिळवून देशाचे पंतप्रधान सर्वाधिक काळ भूषवले होते.
गेल्या 25 वर्षात युनायटेड नॅशनल पार्टीचा जेंव्हा जेंव्हा पराभव झाला होता, तेंव्हा पक्षामध्ये बंडखोरी झाली होती.
विक्रमसिंघे यांनी राजीनामा द्यावा आणि प्रेमदासा यांच्याकडे पक्षाचे नेते पद आणि विरोधी पक्ष नेते पद सोपवावे, अशी मागणी सरकारमधील सर्वात तरुण मंत्री हरिन फर्नांडो यांनी केली आहे. जर विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला नाही, तर स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
राजपक्षे फेब्रुवारी 2020 मध्ये संसद अधिकृतपणे विसर्जित करू शकतील. तोपर्यंत काळजीवाहू सरकारला कामकाज बघावे लागणार आहे.