#SAvSL Test Series : श्रीलंकेचा ऐतिहासिक मालिका विजय

दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेची दक्षिणआफ्रिकेवर 8 विकेटने मात, कसोटी मालिका 2-0 ने जिंकली

पोर्ट एलिजाबेथ – श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ओशदा फर्नांडो आणि कुसल मेंडिस यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेटने पराभव केला आहे. या विजयासह श्रीलंकेने दोन सामन्याची कसोटी क्रिकेट मालिका 2-0 ने आपल्या नावावर केली आहे.

श्रीलंकेने मालिका 2-0 ने जिंकत इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेला त्यांच्यात भूमीवर हरवत मालिका जिंकणारा श्रीलंका हा पहिला आशियाई देश ठरला आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 222 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव सर्वबाद 154 वर आटोपला. त्यामुळे आफ्रिकेला 68 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या गोलंदाजानी चांगली कामगिरी करत आफ्रिकेच्या संघाला अवघ्या 128 धावांवर रोखले.

पहिल्या डावातील 68 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 128 धावा असं मिळून एकूण 197 धावांचे आव्हान आफ्रिकेने श्रीलंकेच्या संघाला दिले. मात्र श्रीलंकेने हे आव्हान 45.4 षटकांत 2 बाद 197 धावा करत पूर्ण केले. श्रीलंकेकडून दुसऱ्या डावात ओशदा फर्नांडोने नाबाद 75 आणि कुसल मेंडिसने नाबाद 84 धावा करत श्रीलंकेचा विजय साकारला.

दुसऱ्या डावात श्रीलंकेकडून सुरंगा लकमल याने सर्वाधिक 4 तर घनंजय डी सिल्वाने 3 , कसुन राजिथाने 2 आणि विश्वा फर्नाडोने 1 विकेट घेतली. मालिकेत सर्वाधिक एकूण 224 धावा करणाऱ्या कुसल परेरा याला मालिकावीर गौरविण्यात आले तर दुसऱ्या सामन्यात नाबाद 84 धावांची खेळी करून संघास विजय मिळवून देणाऱ्या कुसल मेंडिस हा सामनावीरांचा मानकरी ठरला.

Leave A Reply

Your email address will not be published.