रामेश्वरम – श्रीलंकेच्या सागरी हद्दीचा भंग केल्याबद्दल गेल्या 3-4 वर्षात जप्त केलेल्या मच्छिमार नौका नष्ट करण्यास तेथील न्यायालयाने प्रशासनाला परवानगी दिली आहे.
जाफना येथील न्यायालयाने जप्त केलेल्या 94 बोटींपैकी 27 बोटी नष्ट करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या बोटी तामिळनाडूतील मच्छिमारांच्या असून हे मच्छिमार सध्या श्रीलंकेच्या कोठडीमध्ये आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मच्छिमारांच्या नौका नष्ट करण्याच्या आदेशांमुळे तामिळनाडूतील मच्छिमार संघटनेने संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. जप्त केलेल्या या नौका नष्ट न करण्याचे आणि या नौका मूळ मालकांना परात मिळवून देण्याचे आवाहन मच्छिमार संघटनेचे नेते पी. सेसुराजा यांनी केले आहे.
श्रीलंकेच्या नौदलाने तामिळनाडूच्या मच्छिमारांच्या अनेक नौका अलीकडच्या काही वर्षांत त्यांच्या सागरी हद्दीत मासेमारी केल्याच्या आरोपाखाली जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या काही बोटी पूर्वी टप्प्याटप्प्यांमध्ये सोडल्या गेल्या आणि मच्छिमारांनी त्या परत आणल्या होत्या.