अभिनेत्री स्पृहा जोशीची दिवाळी भोपाळमध्ये, घरच्यांच्या आठवणीने स्पृहा भावूक

मुंबई – दिवाळीमध्ये सर्वजण एकत्र येतात आणि हा सण आनंदाने साजरा करतात. त्यामुळे दिवाळीसणाला आपण आपल्या व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ काढण्याचा आणि आपल्या घरच्यांसोबत राहण्याचा प्रयत्न करतो. अभिनेत्री स्पृहा जोशी सुध्दा दरवर्षी न चुकता आपल्या घरच्यांसोबतच दिवाळी साजरी करते. मात्र, यंदाची दिवाळी स्पृहाला तिच्या घरच्यांसोबत साजरी करता येणार नाही. ती एकटी भोपाळला असणार आहे, आणि त्यामूळे ती सध्या तिच्या घरच्यांना खूप मिस करत आहे.

याबाबत स्पृहा सांगते, “सध्या मी भोपाळमध्ये माझ्या आगामी हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. लवकरच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने सध्या वेगाने चित्रीकरणाचे काम सुरू आहे. इथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त अर्ध्या दिवसाची सुट्टी आहे. त्यामुळे आसपास राहणारे अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ त्यांच्या घरी जातील. पण भोपाळपासून मुंबई खूप दूर असल्याने मला घरी पोहोचणे शक्य होणार नाही. त्यामुळे मी दिवाळीत भोपाळला अगदी एकटी असणार आहे.”

स्पृहा जोशी पूढे म्हणते, “खरं तर, दिवाळी हा माझा सर्वात आवडता सण आहे. आजवरचा इतक्या वर्षांचा माझा नियम होता, की, दिवाळीला तर घरीच राहायचं. पण यंदा मात्र पहिल्यांदा घरच्यांपासून दूर एकटीच दिवाळीत राहत असल्याने मन भरून आलंय. अशावेळी जाणवतं, की, सणाच्यादिवशी आपली माणसं जवळ असणं किती महत्वाचं असतं. मला घरच्यांची खूप आठवण येतेय.”

Leave A Reply

Your email address will not be published.