साताऱ्यात रविवारी रंगणार “वसंतोत्सव 2020′ मैफिल

सातारा – ख्यातनाम गायक (कै.) पं. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “वसंतोत्सव 2020- वसंतराव एक स्मरण!’ हा कार्यक्रम रविवारी दि. 2 रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केला आहे, अशी माहिती पंचम ग्रुपचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कुलकर्णी म्हणाले, “”वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे गेली अनेक वर्षे पुणे आणि मुंबई येथे वसंतोत्सव आयोजित केला आहे. यावर्षी पं. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “वसंतराव एक स्मरण’ हा कार्यक्रम पुणे व मुंबईव्यतिरिक्त दहा ते बारा शहरांमध्ये करण्याचे योजिले आहे. त्यातील पहिला मान पंचम ग्रुपच्या कार्यकारिणीच्या प्रयत्नाने सातारा शहराला मिळाला आहे. वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि आजचे आघाडीचे तरुण गायक राहुल देशपांडे हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

वसंतराव देशपांडे यांच्या सांगितिक प्रवासाचा आढावा असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.” साताऱ्यातील पंचम ग्रुप आणि पुण्याची वायोलिन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने “वसंतराव एक स्मरण’ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळेल, असा विश्‍वास श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केला. या विशेष मैफिलीमध्ये राहुल देशपांडे यांच्यासमवेत प्रियांका बर्वे या सहगायिका असणार आहेत. या कार्यक्रमामध्ये निखिल फाटक (तबला), आदित्य ओक (संवादिनी), सत्यजित प्रभू (सिंथेसायझर), अमर ओक (बासरी) असे विविध गुणी कलाकार साथ-संगत करणार आहेत. वैभव जोशी आणि स्पृहा जोशी हे दोघेजण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.

पंचम ग्रुपने गेली 13 वर्षे अनेक दिग्गज कलाकारांच्या मैफिलीचे यशस्वीरित्या आयोजन केले आहे. गायन, वादन आणि नृत्य या तीनही कलांचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न पंचम ग्रुपतर्फे केला जातो. गेल्या काही वर्षात उस्ताद झाकीर हुसेन, पंडित शिवकुमार शर्मा, उस्ताद शाहीद परवेझ, पंडित उल्हास कशाळकर, उस्ताद राशिद खान, कौशिकी चक्रवर्ती, अश्‍विनी भिडे देशपांडे, शर्वरी जमेनिस अशा अनेक नामवंत कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. पंचम ग्रुपचा चौदाव्या वर्षातील “वसंतराव एक स्मरण’ हा पहिला कार्यक्रम आहे.

2020 या वर्षातील सभासद नोंदणी सुरू आहे. पंचम ग्रुपतर्फे एका वर्षात चार कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सभासद वर्गणी वार्षिक एक हजार रुपये प्रति व्यक्ती अशी आहे. शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार या उद्देशातून या ग्रुपची स्थापना झाली आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना वार्षिक नोंदणीत भरघोस सवलत सहाशे रुपये जाहीर केली आहे. सातारकर रसिकांनी राहुल देशपांडे यांच्या या विशेष मैफिलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन श्रीराम कुलकर्णी यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.