मंचर -येथील 500 लहान मोठी दुकाने, सार्वजनिक जागा ग्रामपंचायतीने औषध फवारणी करून रविवारी (दि. 29) निर्जंतुकीकरण केले. सुमारे 10 हजार लिटर औषधाची फवारणी केल्याची केल्याची माहिती सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिली.
मंचर शहरात रविवारी फक्त वैद्यकीय सेवा सुरू होती. मेडिकल दुकाने, दुधाची दुकाने तसेच इतर व्यवसाय बंद ठेवावेत, असे आवाहन सरपंच दत्ता गांजाळे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनास मंचरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. दोन वाहनाद्वारे वाड्या आणि वस्त्यांवर फवारणी करण्यात आली. तसेच मंचर बाजार समिती, खरेदी विक्री संघ, शरद बॅंक, मंचर बसस्थानक, पोलीस ठाणे, प्रांत कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, ग्रामपंचायत पटांगण इत्यादी सार्वजनिक गर्दीच्या जागेवर दुसऱ्यांदा फवारणी करण्यात आली. इतर दिवशी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून इतर दुकाने 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवावी. तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच दत्ता गांजाळे यांनी केले आहे.