करोना विषाणूचा प्रसार थुंकीद्वारे!

अभ्यास सुरू : संसर्गाचा धोका कायम, तरीही घाबरण्याचे कारण नाही

पुणे – नवीन करोना विषाणूचा प्रसार थुंकीद्वारे होत असून, थुंकी सुकली नाही तर हा विषाणू 17 दिवसांपर्यंत हवेत जिवंत राहू शकतो. सध्यातरी स्वाइन फ्लूच्या लक्षणांप्रमाणेच “करोना’ची लक्षणे असून, देशात आतापर्यंत पाच रुग्णांना करोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे.

त्यामुळे त्या विषाणूची जनुकीय रचना कशी आहे किंवा त्याचे स्वरूप कसे आहे, हे सांगणे अवघड आहे. देशात “करोना’च्या संसर्गाचा धोका कायम असला, तरी घाबरण्याचे कारण नाही. त्यासाठी नागरिकांनी सावध राहावे, असा सल्ला देत “करोना’ विषाणूचा अभ्यास सुरू असल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) संसर्गजन्य विभागाचे प्रमुख डॉ. रमन गंगाखेडकर यांनी दिली.

डॉ. गंगाखेडकर पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. “करोना’वर ते म्हणाले, “देशात चीन तसेच बाधित देशातून आलेल्या तीन ते पाच जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र, मृत्यू झालेल्या तरुणाची चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली आहे. तरीही पुन्हा एकदा पुण्याच्या “एनआयव्ही’त चाचणीसाठी नमुने पाठवण्यात आले आहेत. “करोना’च्या विषाणूचा संसर्ग मानवाद्वारे मानवाला झाल्यास तो पसरू शकतो. परिणामी “करोना’ची साथ वेगाने पसरू शकते.’

“देशातील नागरिकाला त्याची लागण झाल्यास आणि त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला संसर्ग झाल्यास देशात खऱ्या अर्थाने लागण वाढण्याची भीती आहे. तत्पूर्वी करोनाच्या विषाणूचा अभ्यास सुरू केला आहे.

मात्र, देशातील व्यक्तीला लागण झाल्यानंतरच करोनाच्या विषाणूची जनुकीय रचना कशी आहे, त्याचे स्वरूप कसे आहे किंवा तो “म्युटेट’ होतो का’ याबाबत सांगणे शक्‍य होईल.

दोन दिवसांत 33 ठिकाणी प्रयोगशाळा
देशात आतापर्यंत करोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. तीन हजार रुग्णांची चाचणी करण्यात आली असून, संपूर्ण देशात 14 प्रयोगशाळा कार्यान्वित आहे. मात्र, या प्रयोगशाळांची संख्या कमी असून, येत्या दोन दिवसांत 33 ठिकाणी प्रयोगशाळा कार्यान्वित केल्या जातील. भविष्यात देशामध्ये “करोना’ची लागण होण्यास सुरुवात झाली, तर त्या वेळी “एनआयव्ही’वर ताण येऊ नये यासाठी आवश्‍यकता वाटल्यास 106 ठिकाणी प्रयोगशाळा कार्यान्वित केल्या जातील. अनेक प्रयोगशाळा सुरू करून देशात “पॅनिक’ स्थिती निर्माण करायची नाही, असे डॉ. रमन गंगाखेडकर यांनी दिली.

करोनाबाधित व्यक्ती सार्वजनिक जागी थुंकला, तर त्याद्वारे संसर्ग होऊ शकतो. ही थुंकी न वाळल्यास त्यात 17 दिवस विषाणू जिवंत राहू शकतात. त्यामुळे रस्त्यावर थुंकू नये, कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत, यासारख्या छोट्या गोष्टींची खबरदारी नागरिकांनी बाळगणे आवश्‍यक आहे
– डॉ. रमन गंगाखेडकर, संसर्गजन्य विभागाचे प्रमुख (आयसीएमआर)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.