दौंड तालुक्‍यात साथीच्या आजारांचे थैमान

– विशाल धुमाळ

दौंड तालुक्‍यात साथीच्या आजाराने थैमान घातले असून, त्यामुळे येथील दवाखाने हाऊसफुल्ल होत असल्याचे चित्र सध्या तालुक्‍यात पाहावयास मिळत आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया, संसर्गजन्य ताप, सर्दी, खोकला, गोचीड ताप… अशा आजारांनी तालुक्‍यातील नागरिक सध्या त्रस्त आहेत. हवामानातील अनियमितता- कधी ऊन, कधी पाऊस, कधी गारवा अशा स्थितीमुळे साथीच्या रोगांना आमंत्रणच मिळत आहे.

दौंड शहरात तर सध्या डेंग्यूच्या साथीने थैमान घातल्याने शहरातील सर्व खासगी व सरकारी रुग्णालयानमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. डेंग्यूसदृश्‍य रुग्णाची तपासणी करण्यासाठी विविध तपासण्या कराव्या लागतात, यामुळे सर्वसामान्य गरीब नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होत आहे. यामुळे शहरातील नगरपालिका प्रशासनाने, स्वयंसेवी संस्थांनी किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांनी डेंग्यू उत्पत्तीची साधने नष्ट करावीत, अशी मागणी होत आहे.

शहराबरोबरच ग्रामीण भागातही अशीच स्थिती आहे. मात्र यासाठी ग्रामपंचायतींकडून कुठल्याही प्रकारची उपाययोजना होताना दिसून येत नाही. येथेही डेंग्यूची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे गरजेचे आहे. तालुक्‍यात सर्वच भागात धुरळणी केली, तर साथीचे आजार कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र तशी धुराळणी होताना दिसत नाही.

ग्रामसेवकांचा संपही सध्या सुरू असल्यामुळे त्यांच्याकडून धुरळणीची अपेक्षा नागरिक कशी करू शकतात, असाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. धुरळणी मशीन सक्षम असणाऱ्या ग्रामपंचायतींनी स्वतः खरेदी केल्या आहेत. मात्र त्यातून धुरळणी होतच नाही, अशी बोंब आहे. एकंदरीतच तालुक्‍यात साथीच्या आजारांनी थैमान घातल्यामुळे येथील रुग्णालये “हाऊसफुल्ल’ झाली आहेत, असेच म्हणावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.