मुंबई – भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे आणलेल्या माजी कर्णधार व बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांचाही या पदाचा कार्यकाल संपणार आहे. यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात गांगुली या पदावरून पायउतार होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केवळ गांगुलीच नव्हे तर सचिव जय शाह यांचीही 3 वर्षांची मुदत याच महिन्यात संपत असून या दोघांच्या जागी नवा अध्यक्ष आणि सचिव नेमला जाणार का गांगुली व शहा यांना मुंदवाढ दिली जाणार याकडे आता लक्ष लागणार आहे.
2019 सालच्या ऑक्टोबर महिन्यात गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष बनले. त्यापूर्वी ते बंगाल क्रिकेट संघचेचे अध्यक्ष होते. गांगुली 2015 सालापासून बंगाल क्रिकेट संघटनेत कार्यरत होते.
गांगुली यांच्या कार्यकाळातच राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण नव्या इंनिंगसाठी सज्ज झाले. द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुखम्हणून बेंगळुरूमध्ये कार्यरत झाला होता. त्यानंतर गांगुली यांनीच द्रविडला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी घेण्यास राजी केले. तसेच गांगुली यांनी लक्ष्मणला एनसीएच्या संचालकपदी नियुक्त केले. आता येत्या मार्च महिन्यात होत असलेल्या बीसीसीआयच्या बैठकीत गांगुली व शहा यांच्या कार्यकालाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.