पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खेळाडू आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे दि. 5 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत. वैध क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल वेळेत सादर करावेत, असे आवाहन आयोगाने केले आहे.
आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेण्यात आल्या. यासाठी ज्या उमेदवारांनी खेळाडू आरक्षणाचा दावा केला आहे, त्यांना जाहिरातीला अनुसरून आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. सक्षम क्रीडा प्राधिकरणाने निर्गमित केलेला क्रीडा प्रमाणपत्र अथवा त्यासाठी केलेल्या अर्जाची पोहोचपावती पुरावा म्हणून सादर करावीत.
कागदपत्रे वेळेत सादर केल्यास संबंधीत उमेदवाराचा खेळाडू आरक्षणाचा दावा रद्द करण्यात येईल व अशा पद्धतीने रद्द केलेला दावा नंतरच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतला जाणार नाही. खोटी, बनावट, खाडाखोड केलेली, अवैध, नियमानुसार नसलेले अथवा सक्षम अधिकाऱ्याने प्रदान न केलेले कागदपत्र आढळल्यास अशी कृती आयोगाची फसवणूक करणारी समजण्यात येईल.
अशा उमेदवारांना आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा व निवडीपासून प्रतिरोधित करण्यात येईल. एवढेच नव्हे, अशा उमेदवारांविरुद्ध कारवाईसुद्धा करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.