अबुधाबी – भारतीय संघाच्या अपेक्षांवर पाणी फेरणारा पराभव अफगाणिस्तानने स्वीकारला. न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा 8 गडी राखून पराभव करत आठ गुणांसह थाटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. न्यूझीलंडच्या विजयामुळे आता भारतीय संघाचा या नामिबियाशी होणारा सामना केवळ औपचारिकताच राहणार आहे.
हा सामना अफगाणिस्तानने जिंकावा यासाठी भारतीय चाहत्यांनी प्रार्थनाही केल्या. मात्र, हा भ्रमनिरास ठरला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानला 124 धावांवर रोखले व 19 व्या षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात 125 धावा करत विजय प्राप्त केला.
अफगाणिस्तानचा कर्णधार महंमद नबी याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्याच अंगलट आला. ट्रेंट बोल्ट व टीम साउदी यांनी त्यांना सुरुवातीलाच हादरे दिले. यातून अफगाणिस्तानचे फलंदाज सावरलेच नाहीत. 3 बाद 19 अशा स्थितीनंतर त्यांच्या नजीबुल्लाह झर्दानने एकाकी लढत दिली. त्याने गुलबदन नईब व कर्णधार महंमद नबी यांना साथीला घेत संघाला शतकी धावसंख्या उभारून दिली. नईब 15 तर, नबीने 14 धावा केल्या.
झर्दानने 48 चेंडूत 6 चौकार व 3 षटकार फटकावताना 73 धावांची खेळी केली. त्यांचा डाव 20 षटकांत 8 बाद 124 असा रोखला गेला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 3 तर, टीम साउदीने 2 गडी बाद केले. इश सोधी, ऍडम मिल्ने व जेम्स निशाम यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
विजयासाठी 125 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने सावध सुरुवात केली. मुजीब उर रेहमानने डॅरेल मिशेलला 17 धावांवर बाद केले तेव्हा न्यूझीलंडच्या 26 धावा झाल्या होत्या. त्यातच भरात असलेला मार्टीन गुप्टीलही परतला. त्याने 28 धावा केल्या.
त्यानंतर कर्णधार केन विल्यमसनने डेव्हन कॉनवेच्या साथीत तिसऱ्या गड्यासाठी 68 धावांची अखंडित भागीदारी केली व 19 व्या षटकात संघाचा विजय साकार केला. विल्यमसनने नाबाद 40 धावांच्या खेळीत 42 चेंडूत 3 चौकार फटकावले. कॉनवेने नाबाद 36 धावांच्या खेळीत 32 चेंडूत 4 चौकार मारले. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रेहमान व रशिद खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान – 20 षटकांत 8 बाद 124 धावा. (नजीबुल्लाह झर्दान 73, गुलबदन नईब 15, महंमद नबी 14, ट्रेंट बोल्ट 3-17, टीम साउदी 2-23, इश सोधी 1-13, ऍडम मिल्ने 1-17, जेम्स निशाम 1-24). न्यूझीलंड – 18.1 षटकांत 2 बाद 125 धावा. (मार्टीन गुप्टील 28, डॅरेल मिशेल 17, केन विल्यमसन नाबाद 40, डेव्हन कॉनवे नाबाद 36, रशिद खान 1-27, मुजीब उर रेहमान 1-31).