पुणे – आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर (असद) संघाने आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स क्रीडा स्पर्धेतील फुटबॉल आणि व्हॉलिबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत असद संघाने आकुर्डीच्या डी. वाय. पाटील कॉलेज संघावर मात केली. विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
ही स्पर्धा वानवडी येथील एसआरपीएफच्या मैदानावर झाली. या स्पर्धेतील मुलांच्या गटाच्या अंतिम सामन्यात असद संघाने डी. वाय. पाटील संघावर 3-0ने मात केली. ही लढत एकतर्फीच झाली. यात पाचव्याच मिनिटाला शांतनूू भोसलेने गोल करून असदला आघाडी मिळवून दिली. यानंतर लढतीच्या 23व्या मिनिटाला प्रद्युम्न खंदाडेने गोल करून असदची आघाडी 2-0ने वाढवली. नंतर 33व्या मिनिटाला परीक्षित ढोलेने करून असदला 3-0ने विजय मिळवून दिला.
तर, व्हॉलिबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटात असद संघाने डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (पीव्हीपीसीओए) संघावर 25-20, 10-25, 15-10 अशी मात केली आणि विजेतेपद मिळवले. असद संघाकडून शांतनू इनामतीने विजयात मोलाचा वाटा उचलला. मुलींच्या गटात पीव्हीपीसीओए संघाने बीएनसीए संघावर 25-19, 25-16 अशी मात करून विजेतेपद मिळवला. यात पीव्हीपीसीओएच्या इशिता सुरतवालाने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळवला.