पुणे – पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील सहाव्या पीएमडीटीए-आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगरमानांकित प्रज्ञेश शेळके याने आठव्या मानांकित स्मित उंडरेचा 5-3 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
दिलीप वेडेपाटील स्पोर्टस अकादमी येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात तिसऱ्या मानांकित संयम पाटील याने अमेय साळवनकरचा 5-2 असा तर, अथर्व येलभर याने आर्यन कीर्तनेचा 5-1 असा एकतर्फी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. चिन्मय ठाकरेने आश्रित माज्जीला 5-2 असे पराभूत केले. स्पर्धेचे उर्वरित फेरीचे सामने हे पावसामुळे पुढे ढकलण्यात आले असून उर्वरित फेऱ्यांचे सामने शनिवार 15 व रविवार 16 जून रोजी होणार आहेत.