सिमन्सने पटकावले विजेतेपद

अंतिम लढतीत उडविला टीसीएसचा धुव्वा

पुणे – विजयासाठी फेव्हरिट समजला जात असलेल्या आणि स्पर्धेत जबरदस्त खेळ करणाऱ्या टीसीएस संघाची निर्णायक सामन्यात हाराकिरी झाली. व्हिन्टेंज कप आय-टी टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या आणि अंतिम लढतीत सिमन्स संघाने सौरभ जळगावकरचे अर्धशतक आणि निखिल पाटील, नमन शर्मा यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर टीसीएस संघावर 73 धावांनी मात करून विजेतेपद पटकावले. सिमन्स संघाने दिलेल्या 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीसीएसचा डाव 15.5 षटकांत 98 धावांत आटोपला.

प्रथम स्पोर्टस आयोजित या स्पर्धेची अंतिम लढत नेहरू स्टेडियमवर रंगली. सिमन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 5 बाद 171 धावांपर्यंत मजल मारली. हिमांशू अगरवाल दुसऱ्याच षटकात बाद झाल्यानंतर अतुल पवार आणि सौरभ जळगावकर यांनी दुसऱ्या गडीसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अतुल पवार 20 धावांवर बाद झाला. अर्धशतकानंतर सौरभही माघारी परतला. त्याने 40 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारसह 50 धावा केल्या. यानंतर सौरभने 19 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 34, तर विशाल रैनाने 22 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 37 धावा करून सिमन्स संघाला 171 धावांपर्यंत पोहोचविले.

यानंतर सिमन्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक मारा करून टीसीएसच्या फलंदाजांवर अंकुश राखला. पहिल्याच षटकात निखिल पाटीलने मयंक जसोरे, गौरवसिंग आणि विक्रमजितसिंग यांना बाद करत टीसीएसला तीन धक्‍के दिले. त्यामुळे पहिल्या षटकांत टीसीएसची 3 बाद 6 अशी बिकट अवस्था झाली. त्यानंतर गौरव भालेराव आणि तेजपालसिंगही झटपट बाद झाले.

टीसीएसचा निम्मा संघ अवघ्या 7 धावांत माघारी परतला. सहाव्या षटकात निकुंज अगरवालही बाद झाला. यावेळी टीसीएसच्या फलकावर केवळ अकरा धावा लागल्या होत्या. शंतनू नाडकर्णीने 28 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार खेचत 35, तर अभिनव कालियाने 21 चेंडूंत 23 धावा जोडून टीसीएसची लाज राखली. नमन शर्माने अचूक मारा करून टीसीएसच्या तळाच्या तीन फलंदाजांना बाद केले. निखिल पाटीलने चार, तर नमनने तीन गडी बाद केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×