विश्‍वचषक जिंकण्यासाठी सांघिक कामगिरी आवश्‍यक : सचिन तेंडुलकर

File photo

विराटसह इतर खेळाडूंनाही चांगला खेळ करणे गरजेचे

नवी दिल्ली – भारतीय संघ विश्‍वचषक स्पर्धेत विजेतेपदाचा दावेदार आहे. मात्र, ही किमया एकटा विराट किंवा बुमराह करु शकणार नाहीत. तर इतर खेळाडूंनीही पुढाकार घेत प्रत्येक सामन्यात चांगला खेळ करणे गरजेचे आहे, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मांडले आहे. यावेळी तेंडुलकरने कुलदीप यादव, युजवेंद्र चहल यांच्या भूमिकेसोबत फलंदाजातील चौथा क्रमांक आणि इंग्लंडमधील सपाट खेळपट्ट्यांवर गोलंदाजीबाबत देखील आपले मत मांडले.

कर्णधार म्हणुन विराट कोहलीचा हा पहिलाच विश्‍वचषक असल्याने त्याच्यावर दबाव असेल का? या प्रश्‍नाचे उत्तर देताना सचिन म्हणाला, प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करणारे काही खेळाडू असतात. पण संघाच्या मदतीशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. एका खेळाडूच्या जीवावर स्पर्धा जिंकता येत नाही. दुसऱ्यांना देखील आपली भूमिका पार पाडावी लागेल. असे न केल्यास निराशाच हाती येईल.

तसेच चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाबाबत तो म्हणाला, चौथा क्रमांक मोठी समस्या नाही. भारतीय संघात सध्या असे अनेक फलंदाज आहेत, जे या क्रमांकावर खेळू शकतात. फलंदाजी क्रमवारीत नेहमीच लवचिकता असावी. मला ही फार मोठी समस्या वाटत नाही. आपल्या खेळाडूंनी एवढे क्रिकेट खेळले आहे की ते कुठल्याही क्रमवारीवर फलंदाजी करू शकतात.
यंदाच्या विश्‍वचषक स्पर्धेत फिरकी गोलंदाजांची भूमिका ही कोणत्याही संघासाठी महत्त्वाची ठरेल, असे सचिनला वाटते. भारताकडे चहल आणि यादव असे दोन फिरकी गोलंदाज आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मालिकेत त्यांना फारशी चमक दाखवता आली नाही.

या दोघांवर बोलताना सचिनने सांगितले की, असे अनेक गोलंदाज आहेत. ज्यांच्याविरुद्ध फलंदाज धावा काढतात. पण अशा गोलंदाजांनाच विकेटस्‌ मिळतात. कुलदीप व चहल यांना ऑस्ट्रेलियन मालिकेला घेऊन चिंतीत होण्याची गरज नाही. मुरलीधरनचे उदाहरण देताना सचिन म्हणाला, मुरली “ऑफ ब्रेक’ व “दुसरा’ टाकायचा. फलंदाज त्याची गोलंदाजी ओळखायचे. मात्र, तरीही त्याला विकेटस्‌ मिळायच्याच. त्यामुळे यंदाही भारतीय गोलंदाज विश्‍वचषक स्पर्धेत मोलाचा वाटा उचलतील, यात कोणतीही शंका नाही असेही सचिनने वेळी सांगितले.

पाचव्या क्रमांकासाठी धोनी योग्य

माझ्या मते धोनीने विश्वचषकात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायला हवे. स्पर्धेत नेमका कोणता संघ अंतिम असेल याची मला कल्पना नाही. मात्र शिखर आणि रोहित डावाची सुरुवात करणार असतील तर विराट हा साहजिकपणे तिसऱ्या स्थानावर खेळेल. यानंतर चौथ्या क्रमांकावर कोणत्याही फलंदाजाला संधी दिल्यास पाचव्या क्रमांकासाठी धोनी हा योग्य पर्याय आहे. धोनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आल्यास तो अखेरच्या षटकापर्यंत सामना खेचू शकतो. सहाव्या क्रमांकापासून भारताचे सर्व फलंदाज फटकेबाजी करणार आहेत. त्यामुळे धोनीवरचा दबावही थोडा हलका होऊ शकतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)