ब्रीज स्पर्धा : अक्‍यूरीयस संघाला विजेतेपद तर बेंद्रे संघ उपविजेता

39 वी सुहास वैद्य मेमोरियल महाराष्ट्र राज्य ब्रीज स्पर्धा

पुणे – पुण्याच्या मिलिंद भडभडेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या अक्‍यूरीयस संघाने तिन्ही राऊंडमध्ये संयमाने खेळ करत सर्वाधिक 41.29 गुण मिळवून 39व्या सुहास वैद्य मेमोरियल महाराष्ट्र राज्य ब्रीज स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर कौस्तुभ बेंद्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंद्रे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

बेंद्रे संघाला पहिल्या राऊंडमध्ये कमी गुण मिळाले. परंतु नंतरच्या दोन राऊंडमध्ये आपल्या जोडीदाराशी चांगला समन्वय राखत 29.66 गुण मिळविले. याच प्रकारात हेमा देवरा यांच्या पेन-पल संघाने चांगली लढत देत 27.59 गुण मिळविले. परंतु त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर रवी रमणच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या समाधान संघाने पहिले दोन दिवस चांगली कामगिरी केली होती. परंतु अंतिम राऊंड रॉबिनमध्ये त्यांना 21.46 गुण मिळवता आले. त्यामुळे त्यांना चौथे स्थान मिळाले.

महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनच्या वतीने आणि पुणे जिल्हा ब्रीज असोसिएशन आणि पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या सहकार्याने आयोजित 39व्या सुहास वैद्य मेमोरियल महाराष्ट्र राज्य ब्रीज स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पहिल्या चार संघादरम्यान स्वीस लीगचे तीन राऊंड खेळविले गेले.

आयएमपी पेअर्स या प्रकारात पेअर्समध्ये दिवसभर राऊंड खेळविण्यात आले. या राऊंडनंतर या पेअर्समधून गुणानुक्रमे पहिल्या 24 पेअर्सना फ्लाईट “अ’ या मुख्य फेरीत प्रवेश देण्यात आला. उर्वरित पेअर्सचा फ्लाइट “ब’ या दुसऱ्या गटात समावेश केला गेला. या दोन गटात पुन्हा गटवार साखळी राऊंड खेळविण्यात आले.

यामध्ये फ्लाइट “अ’ गटातून रवि रंमण आणि एस. भावनानी या मुंबईच्या जोडीने 74.00 गुणांसह विजेतेपद मिळविले. तर मुंबईच्याच विजय पाथरकर आणि टी. व्ही. रामाणी यांनी 67.00 गुण मिळवून उपविजेतेपद मिळाले. या स्पर्धेची तांत्रिक बाजू टूर्नामेंट डायरेक्‍टर बी. जी. दक्षिणदास यांनी सांभाळली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.