जस क्रिकेट अकादमी करंडक टी-20 प्रिमियर लीग
प्रभात – साखळी फेरीतील सामन्यात उबेद भट याने केलेल्या नाबाद 43 धावांच्या जोरावर जस क्रिकेट अकादमी संघाने बारणे क्रिकेट अकादमी संघाचा 8 गडी राखून पराभव करत येथे होत असलेल्या युनायटेड स्पोर्टस क्लब आणि जस क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित जस क्रिकेट अकादमी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला.
धानोरी येथील प्रकाश टिंगरे मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्यांदा फलंदाजी करताना बारणे क्रिकेट अकादमी संघाने 15 षटकांत 3 बाद 117 धावा केल्या. यात वेदांत अमृतकरने 50 चेंडूत नाबाद 62 धावा, विश्वजीत फेगडेने 17 धावा, अथर्व आंबलगेने 14 धावा काढून संघाच्या डावाला आकार दिला. जस क्रिकेट अकादमीकडून नवशिष्ट गिरीने 13 धावात 1 गडी बाद केला.
118 धावाम्चे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या जस क्रिकेट अकादमी संघाने हे आव्हान केवळ 13.2 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात 121 धावा करून पूर्ण केले. यावेळी जस अकादमीकडून उबेद भटने 19 चेंडूत 1 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 43 धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. उबेदला नितेश सिंग 23, नवशिष्ट गिरीने नाबाद 10 धावा करून सुरेख साथ दिली. बारणे क्रिकेट अकादमीकडून विश्वजीत फेगडेने 36 धावात 2 गडी बाद केले. सामनावीर हा ‘किताब उबेद भट याला देण्यात आला.
सविस्तर निकाल –
साखळी फेरी – बारणे क्रिकेट अकादमी – 15 षटकांत 3 बाद 117 (वेदांत अमृतकर नाबाद 62, विश्वजीत फेगडे 17, अथर्व आंबलगे 14, नवशिष्ट गिरी 1-13) पराभूत वि. जस क्रिकेट अकादमी: 13.2 षटकांत 2 बाद 121 (उबेद भट नाबाद 43, नितेश सिंग 23, नवशिष्ट गिरी नाबाद 10, विश्वजीत फेगडे 2-36), सामनावीर-उबेद भट.