Paris Paralympics 2024 : – भारताच्या खेळाडूंनी नुकत्याच पॅरिस येथे झालेल्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये शानदार कामगिरी करताना 29 पदके जिंकताना पदकपालिकेत 18 वे स्थान राखले. यापूर्वी झालेल्या टोकियो पॅरालिम्पिक खेळामध्ये भारताने 19पदके जिंकली होती. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आतापर्यतच्या पॅरालिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. खेळाडूंच्या चमकदार कामगिरीला सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विविध बक्षिसांची घोषणा आज करण्यात आली.
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना 75 लाख, रौप्य पदक मिळविणाऱ्या खेळाडूला 50 लाख तर कांस्य पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना 25 लाखांचे बक्षीस केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्रा मनसुख मांडविया यांनी केली. मिश्र प्रकारात पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना ही रक्कम विभागून मिळणार आहे.
पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 7वर्ण, 9 रौप्य व 13 कांस्य पदकांची कमाई केली होती. खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार ही रक्कम अदा करण्यात येणार असल्याचाही क्रीडामंत्री मांडविय यांनी बोलताना सांगितले.
भारतीय संघाने पॅरालिम्पिक व ऑलिम्पिक या दोन्ही ठिकाणी चांगली कामगिरी केली होती. 2028 साली लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या दोन्ही स्पर्धासाठी खेळाडूंना पूर्ण समर्थन व सुविधा उपलब्ध करून देण्याचे क्रीडामंत्र्यांनी मान्य केले. सन 2016 मध्ये भारताने 4 पदके, टोकियोमध्ये 19 पदके व पॅरिसमध्ये 29 पदके जिंकताना भारताचा आलेख उंचावत असल्याचे मांडविय म्हणाले.
सात खेळाडूंची सुवर्णकामगिरी…
पॅरा ॲथलीट मुरलीकांत पेटकर यांनी 1972 मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. मुरलीकांत पेटकर हे तेच खेळाडू आहेत ज्यांच्या जीवनावर ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपटही नुकताच प्रदर्शित झाला आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिले पदक नेमबाज अवनी लेखरा हिने जिंकून दिले, जे सुवर्ण पदक होते. यानंतर नितेश कुमार (बॅडमिंटन), सुमित अँटिल (ॲथलेटिक्स,भालाफेक), हरविंदर सिंग (तिरंदाजी), धरमबीर (ॲथलेटिक्स,क्लब थ्रो), प्रवीण कुमार (ॲथलेटिक्स, उंच उडी) आणि नवदीप सिंग (ॲथलेटिक्स,भालाफेक) यांनीही सुवर्णयश मिळविले.