#SLvIND : निर्विवाद वर्चस्वाची भारताला संधी

कोलंबो – श्रीलंकेविरुद्धचे पहिले दोन्ही एकदिवसीय सामने जिंकून मालिका तर जिंकलीच आहे. आता आज होत असलेल्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखण्याची संधी भारतीय संघाला मिळाली आहे.

पहिल्या दोन सामन्यात अडीचशे धावांपेक्षाही जास्त धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करत शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हा संघ दुय्यम नसल्याचे सिद्ध केले आहे. पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉ, धवन, इशान किशन यांनी तर दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव व दीपक चहर यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. अनुभवी व नवोदित खेळाडूंचा हा भारतीय संघ समतोल असून आता ही मालिका 3-0 अशी निर्विवाद जिंकण्यासाठी धवनसेना सज्ज झाली आहे.

श्रीलंका क्रिकेट संघातील काही खेळाडूंना करोनाची बाधा झाल्याने तसेच श्रीलंका क्रिकेट मंडळाशी करारावरून सुरू असलेल्या वादामुळे काही प्रमुख खेळाडूंनी या मालिकेतून माघार घेतल्याने नवोदितांचा भरणा असलेला संघ त्यांनी भारताविरुद्ध मैदानात उतरवला. मात्र, तसे कोणतेही चित्र पहिल्या दोन्ही सामन्यांतून दिसले.

संघात स्थान मिळालेल्या खेळाडूंनी आपली गुणवत्ता दाखवून दिली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात अत्यंत नवख्या खेळाडूंनीही भारताच्या कसलेल्या गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत अडीचशे धावांच्या पुढे मजल मारली. त्यांच्या गोलंदाजांचा तसेच कर्णधारासह अन्य खेळाडूंचा अनुभव कमी पडला त्यामुळे त्यांना संधी मिळालेली असूनही दोन्ही सामने गमवावे लागले. आजचा सामना जिंकून प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांना क्षमतेपेक्षा जास्त सरस खेळ करावा लागेल. वनिंदू हसरंगा याची फिरकी यशस्वी होत असली तरीही भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांवर सातत्याने अंकुश राखावा लागेल.

दुसरीकडे भारतीय संघाने नवव्या क्रमांकापर्यंत आपली फलंदाजी असल्याचे सिद्ध केले आहे. पहिल्या सामन्यात त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी वर्चस्व राखले तर दुसऱ्या सामन्यात नवोदित फलंदाजांनी मिळालेल्या संधीचे सोने केले.

या मालिकेतून भारताच्या प्रमुख संघाला चांगले पर्याय मिळाल्याची साक्ष सूर्यकुमार यादव, दीपक चहर यांनी दिली. गोलंदाजीबाबत बोलायचे तर भुवनेश्‍वर कुमारने पहिल्या सामन्यातील अपयश मागे टाकत दुसऱ्या सामन्यात सरस गोलंदाजी केली.
संघातील यजुवेंद्र चहल व कुलदीप यादव यांना बऱ्याच काळानंतर एकाच सामन्यात एकत्र खेळण्याची संधी मिळाली व त्यांनीही आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली.

रोटेशन पॉलिसी होणार

या मालिकेतील अखेरच्या लढतीत भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड नवोदितांना संधी देतील अशी अपेक्षा आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ, इशान किशन यांच्या जागी ऋतुराज गायकवाड व देवदत्त पडिक्‍कल यांच्यासह नवदीप सैनी व संजू सॅमसन यांनाही संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.