ओम क्रिकेट ऍकॅडमीने उद्घाटनाचा दिवस गाजवला !

स्टेडियम क्रिकेट कप अजिंक्‍यपद स्पर्धा

पुणे – ओम क्रिकेट ऍकॅडमी संघाने राजपुत क्रिकेट क्‍लबचा 8 गडी राखून सहज पराभव करत येथे होत असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे, वसंतदादा सेवा संस्था आणि स्टेडियम क्रिकेट क्‍लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “स्टेडियम क्रिकेट करंडक अजिंक्‍यपद’ स्पर्धेच्या 14 वर्षाखालील गटात स्पर्धेचा उद्घाटनाचा दिवस गाजवला.

14 वर्षाखालील गटाच्या सामन्यामध्ये ओम साळुंखे याने केलेल्या 64 धावांच्या जोरावर ओम क्रिकेट ऍकॅडमीने राजपुत क्रिकेट क्‍लबचा 8 गडी राखून पराभव केला. राजपुत क्रिकेट क्‍लबने पहिल्यांदा फलंदाजी करताना 30 षटकात 10 गडी गमावून 163 धावा केल्या. सर्वेश जाधव (33 धावा) आणि कृष्णा कदम (33) यांनी संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. ओम क्रिकेट ऍकॅडमीने हे आव्हान 20.5 षटकात व 2 गडी गमावून पूर्ण केले. ओम साळुंखे याने 64 धावा केल्या. ओमसह कविश बडेरा याने नाबाद 34 धावा करून संघाला विजयी सलामी मिळवून दिली. तर, 12 वर्षाखालील गटाचा ओम क्रिकेट ऍकॅडमी आणि राजपुत क्रिकेट ऍकॅडमीचा सामना बरोबरीत सुटला.

नेहरू स्टेडियम मैदानावर सुरु असलेली ही स्पर्धा 12, 14, 16 आणि 19 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये होणार आहे. प्रत्येक सामना 30-30 षटकांचा होणार असून स्पर्धेचे सामने नेहरू स्टेडियम आणि स.प. महाविद्यालय मैदानावर होणार आहे, अशी माहिती स्टेडियम क्रिकेट क्‍लबचे भरत मारवाडी यांनी दिली.

स्पर्धेचा अंतिम सामना 31 मे रोजी होणार असून स्पर्धेत एकूण सव्वा लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रत्येक गटातील विजेत्या संघाला करंडक आणि 21 हजार रूपये तर, उपविजेत्या संघाला 11 हजार रूपये आणि करंडक देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साखळी आणि बाद फेरीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक गटात एकूण 10 निमंत्रित संघ सहभागी झाले आहेत. ओम क्रिकेट ऍकॅडमी, राजपुत क्रिकेट ऍकॅडमी, स्टेडियम क्रिकेट क्‍लब, क्‍लब ऑफ क्‍लब, पुणे वॉरीयर्स, रांजणे क्रिकेट क्‍लब, मारवाडी इलेव्हन, पुना क्‍लब, परब क्रिकेट ऍकॅडमी आणि एस. बालन ग्रुप या संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.

सविस्तर निकाल –

12 वर्षाखालील गटः

ओम क्रिकेट ऍकॅडमी : 30 षटकात 7 गडी बाद 161 धावा (राज शुक्‍ला 30, अभिषेक कोळी 25, स्पर्श कांकरीया 2-32, सम्राट कदम 1-12, देवाशिष बापट 1-27) बरोबरी वि. राजपुत क्रिकेट ऍकॅडमीः 30 षटकात 7 गडी बाद 161 धावा (श्रेयस्त वाणी 26 धावा, देवाशिष बापट 18, प्रेम जाधव 2-34, तुशार शर्मा 1-21); सामनावीरः देवाशिष बापट;

14 वर्षाखालील गटः

राजपुत क्रिकेट क्‍लबः 30 षटकात 10 गडी बाद 163 धावा (सर्वेश जाधव 33 धावा, कृष्णा कदम 33, अर्थव ढोरे 4-14, वरद लवटे 2-21, ओम साळुंखे 2-39) पराभूत वि. ओम क्रिकेट ऍकॅडमीः 20.5 षटकात 2 गडी बाद 165 धावा (ओम साळुंखे 64 (45, 4 चौकार, 1 षटकार), कविश बडेरा नाबाद 34, प्रणव एस. 1-32, अभय व्हि. 1-33); सामनावीरः ओम साळुंखे;

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.