साताऱ्याचे क्रीडा संकुल नगरपालिकेच्या ताब्यात द्या

उदयनराजे भोसले; क्रीडा संकुलातील त्रुटींची भरपाई संबंधितांकडून करून घ्यावी

सातारा- जिल्हा क्रीडा संकुल समितीने नवीन क्रीडा संकुल उभारण्यासाठी शाहू स्टेडियम घेतले, परंतु त्याठिकाणी क्रीडा संकुलाऐवजी व्यापारी संकुल उभारुन क्रीडा क्षेत्राची वासलात लावली. क्रीडा क्षेत्राच्या भरभराटीसाठी हे क्रीडा संकुल नगरपरिषदेच्या ताब्यात द्यावे. क्रीडा संकूल उभारणीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियमावलीप्रमाणे राहिलेल्या त्रुटींची पूर्तता बांधकाम केलेल्या ठेकेदार, आर्किटेक्‍ट, तत्कालीन लोकप्रतिनिधी व संबंधितांच्या स्वखर्चातून करवून घेण्यात यावी, बेकायदेशीर बांधकामांबाबत त्यांच्याकडून सशुल्क वसुली करण्यात यावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित क्रीडा संकुलाच्या बैठकीत ते बोलत होते. नगरसेवक ऍड. डी. जी. बनकर, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, क्रीडा संकुल बांधकामाचे आर्किटेक्‍चर उपेंद्र पंडित, रॉबर्ट मोझेस, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी ईर्शाद बागवान, सुरेश साधले, मनोज कान्हेरे, सौ. गीतांजली कदम आदी प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी तथा क्रीडा संकुल समितीच्या अध्यक्षा श्‍वेता सिंघल यांना वस्तुस्थिती सांगताना उदयनराजे भोसले म्हणाले, “”क्रीडा संकुलाचे बांधकाम निकृष्ट झाल्याबाबत तसेच झालेले बांधकाम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियमानुसार न होता ते एक व्यापारी संकुल बनवले आहे. म्हणून चौकशी करण्याबाबत आम्ही गेल्या दहा वर्षापेक्षाही जास्त काळापासून वेळोवेळी मागणी केलीे. मात्र, अद्यापही आम्हाला कुठलाही चौकशी अहवाल मिळालेला नाही. तो तातडीने मिळावा.”

क्रीडा संकुलाची मूळ मालकी आमची होती, त्यावेळेस सातारा शहरातील खेळाडूंसाठी स्टेडियमची उभारणी आमचे वडील तथा तत्कालीन नगराध्यक्ष कै. दादामहाराज यांनी केली. त्यानंतर हे क्रीडा संकुल 99 वर्षाच्या कराराने सातारा नगरपरिषदेकडे हस्तांतरित केले.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार सन 2002-2003 च्या दरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्हयात जिल्हा क्रीडा संकुल समिती निर्माण करण्यात आल्या. नगरपरिषदेच्या ताब्यातील क्रीडा संकुल तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन क्रीडा संकुलाचे बांधकाम झाल्यानंतर नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याच्या अटीवर ताब्यात घेतले. वास्तविक बांधकाम होऊन 15 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही संकुल समितीने क्रीडा संकुल नगरपरिषदकडे हस्तांतरीत केलेले नाही, त्यामुळे क्रीडा संकुल तातडीने ठरलेल्या अटी शर्तीनुसार नगरपरिषदेकडे हस्तांतरीत करावे, अशी मागणी त्यांनी केली.

क्रीडा संकुलाचे बांधकाम करताना स्विमिंग पूल, क्रिकेटचे आणि ऍथलेटिक्‍सचे मैदान हे राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय नियमावलीप्रमाणे बांधले नसल्याने संकुलाच्या बांधकामात सहभागी आहेत, त्या आर्किटेक्‍चर, बिल्डर, लोकप्रतिनिधी यांच्यावर कारवाई करुन राहिलेल्या त्रुटींची भरपाई वसूल करावी, क्रीडा संकुल सुस्थितीत आणण्याकरिता आवश्‍यकता असेल तर जुनी इमारत पाडून विस्तृत मैदान तयार करण्यात यावे, अशी मागणीही उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत लवकरच बैठक घेऊन क्रीडा संकुलामध्ये रणजी सामने तसेच पुढील आयपीएलचे सामने खेळवण्याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संकुलाच्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी हमी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)