जुई, अरिजित, वरुण, सिमरन, मृणाल, आदित्यला विजेतेपद

महाराष्ट्रीय मंडळ आयोजित बॅडमिंटन स्पर्धेचा समारोप

पुणे – जुई जाधव, अरिजित गुंड, सिमरन धिंग्रा, वरुण गंगवार, अर्णव लुणावत, मृणाल सोनार, आदित्य त्रिपाठी, अनन्या देशपांडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून महाराष्ट्रीय मंडळ आयोजित हौशी खेळाडूंसाठीच्या बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या गटातील विजेतेपद पटकावले.

जोशीज बॅडमिंटन क्‍लब, देवधर बॅडमिंटन अकॅडमी व पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा टिळक रस्त्यावरील केळकर-भोपटकर हॉलमध्ये सुरू होती.

या स्पर्धेतील 11 वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत जुई जाधव हिने ध्रीती जोशीवर 15-9, 15-10 अशी मात करून विजेतेपद पटकावले. यानंतर 11 वर्षांखालील मुलांच्या गटात वरुण गंगवारने केविन पटेलवर 15-9, 15-11 अशी मात केली आणि जेतेपद मिळवले. स्पर्धेतील 13 वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत आदित्य त्रिपाठीने समर्थ साठेवर 15-7, 15-11 असा विजय मिळवला. 13 वर्षांखालील मुलींच्या गटात मृणाल सोनारने रिधिमा सहरावतचे आव्हान 15-12, 15-13 असे परतवून लावले.

15 वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत अरिजित गुंडने निनाद कुलकर्णीवर 15-11, 15-10 अशी मात करून बाजी मारली. 15 वर्षांखालील मुलींच्या गटात सिमरन धिंग्राने रक्षा पंचांगवर 15-6, 15-11 अशी मात करून स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

17 वर्षांखालील मुलींच्या गटात अनन्या देशपांडेने सिमरन धिंग्रावर 15-11, 8-15, 17-15 विजय मिळवला आणि जेतेपद मिळवले. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात अर्णव लुणावतने अरिजित गुंडचा 15-11, 15-12 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)