पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – क्रीडा, कला, संस्कृती यांना कोणताही धर्म नसतो, त्यांचा गुणधर्म हा पाण्यासारखा असतो. त्याला देशांची बंधने रहात नाहीत. तसेच रेषा ही जिथे भाषा आहे तेथे शब्द फुटत नाहीत, अशा शब्दांत वयाच्या शंभरीत पदार्पण केलेल्या ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी भावना व्यक्त केल्या.
वसुंधरा क्लब आणि कार्टूनिस्ट कम्बाइन यांच्या विद्यमाने शि. द. यांचा वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्ताने राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मकरंद केळकर, नचिकेत आपटे, नितीन ढेपे, कृष्णकुमार गोयल, साहित्यिका मंगला गोडबोले, चित्रकार वासुदेव कामत, चारुहास पंडित, वसुंधरा क्लबचे वीरेंद्र चित्राव, कार्टूनिस्ट कम्बाइनचे संजय मिस्त्री उपस्थित होते. फडणीस यांच्या कुटुंबीयांच्या वतीने त्यांना १०० दिव्यांनी औक्षण करण्यात आले. तसेच गुलाबाचा हार, पगडी आणि मानपत्र देऊन शि. द. यांचा सत्कार करण्यात आला.
सध्या अॉनलाइनचा जमाना आहे. अनेक गोष्टी अॉनलाइनच्या भाषेत बोलल्या जातात. परंतु अॉनलाइन हा विषय जेव्हा येतो, तेव्हा आपले स्केचबुक मात्र शाबूत ठेवा असा वडीलकीचा सल्ला शि. द. यांनी दिला. तर, नवे आर्ट स्कूल, विद्यापीठ काढण्यापेक्षा जे आहेत ते सुधारले तरी खूप आहे.
या आर्ट स्कूलमधील अधिष्ठातांना साधे फूलही काढता येत नाहीत. तुम्ही स्कूल काढाल पण तेथे शिकवणार कोण ? असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला. इतक्या वर्षात शि. द. यांनी काढलेली ही कला सोपी दिसत असली, तरी ती सोपी नाही. यासाठी वास्तवाचा आणि शरीरशास्त्राचा अभ्यास लागतो.
कल्पना आणि उत्तम रेखाटन येते तेव्हा चित्र चांगले होते, असे ठाकरे म्हणाले. शि. द. हे चुकीच्या देशात जन्माला आलेली व्यक्ती आहे. ते युरोपात जन्मले असते तर बरे झाले असते. तेथे चित्रांसाठी दालन उभे करा असे सांगावे लागत नाही, ते असतेच. असे सांगून ठाकरे यांनी त्यांचे काही अनुभव सांगितले.
दिव्यांगांसाठी, संगीत कला शिकण्यासाठी आणि मराठी भाषेसाठी विद्यापीठ सुरू केले आहे. तसे या कलेसाठीही विद्यापीठ सुरू करू शकतो. सरकार पैसे, जागा देते, परंतु त्यासाठी लागणारा मसुदा तज्ज्ञांकडून तुम्हांला बनवून द्यावा लागेल, असे पाटील यांनी नमूद केले. मिस्त्री यांनी स्वागत केले, चित्राव यांनी प्रस्तावना केल.
सरकारला ठाकरे शैलीत टोला…
“शि. द. अजूनही एवढे ताठ आहेत, अजिबात वाकले नाहीत. त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले. यावर “तितक्या ताठ पद्धतीने आपले सरकार जरी चालले तरी खूप आहे. एवढे वय नसताना सरकार आताच वाकले आहे, जास्त बाहेरचे घेऊ नका,’ असा टोला ठाकरे यांनी पाटील यांना लगावला.