नवी दिल्ली – चीनसह विविध देशांत पसरत असलेल्या करोना विषाणूंचा फटका आता क्रीडा क्षेत्रालाही बसत असल्याचे स्पष्ट होत आहे. विश्वचषक नेमबाजी, बॅडमिंटन, फुटबॉल, रग्बी या क्रीडा स्पर्धांना एकतर स्थगिती देण्यात आली आहे किंवा त्यांच्या ठिकाणांत तसेच वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. भारतात येत्या काही दिवसात सुरू होत असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगला (आयपीएल) देखील यामुळे धोका उत्पन्न होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दिल्लीत येत्या 15 तारखेपासून सुरु होत असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतून अनेक खेळाडूंनी माघार घेतली आहे. वुहान येथे होणार असलेली आशिया बॅडमिंटन स्पर्धा आता मनिला येथे होणार आहे. 21 ते 26 एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
जपानमध्ये होणारी ऑलिम्पिक पात्रता रग्बी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. युरोपात होणार असलेल्या विविध फुटबॉल स्पर्धादेखील एकतर रद्द केल्या गेल्या आहेत तर काही स्पर्धांच्या ठिकाणांत बदल करून अन्यत्र हलविण्यात आल्या आहेत.