डॉ. डी. जे. जाधव ः लोणी काळभोर येथे डेंग्यू प्रतिबंधक जनजागृती मोहीम
लोणी काळभोर (वार्ताहर) – वाढते शहरीकरण, जीवनशैलीतील बदल आणि सदोष जलव्यवस्थापन यामुळे डासांच्या उत्पत्तीचा वेग वाढत आहे. परिसरात डेंग्यूची तीव्रता वाढत असताना नागरिकांनी स्वत: खबरदारी घेणेही तितकेच गरजेचे आहे. आरोग्य विभाग तथा प्रशासन यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वयंस्फूर्तीने जलसाठ्यांची स्वच्छता राखण्याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन लोणी काळभोर (ता. हवेली) प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी केले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर यांचे विद्यमाने डेंग्यू आजाराविषयी पूर्व हवेलीमधील लोणी काळभोरसह कदमवाक वस्ती, मांजरी, महादेवनगर, साडेसतरानळी आणि केशवनगर या गावांतील परिसरात प्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. जाधव बोलत होते. याअंतर्गत शाळा, महाविद्यालये, तसेच अंगणवाडीत जाऊन आरोग्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ डेंगू, मलेरिया आदी साथींच्या आजाराविषयी माहिती आणि त्यांवर करण्याच्या उपाययोजना आदीविषयी मार्गदर्शन करीत आहेत.
यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. जाधव म्हणाले की, ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाचे हे काम आहे असा समज असला तरी टाक्या, हौद, घरातील पाणीसाठ्यांची ठिकाणे नष्ट करणे नागरिकांच्याच हातात आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया या आजारांचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून प्रत्येक वाडी, वस्तीवर व गावठाण परिसरात औषध फवारणीचे काम सुरू केले आहे. तसेच जनजागृती व्हावी म्हणून शाळा, अंगणवाडी मध्ये प्रभातफेरीबरोबरच ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या आजारांची लक्षणे दिसताच तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत असे अवाहन आरोग्य विभागाचे वतीने करण्यात आले आहे.