पिंपळे गुरव (वार्ताहर) – करोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने विसर्जन घाट बंद ठेवले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मदतीने तसेच समाजसेवी संस्थांच्या मदतीने गणेशमूर्ती संकलन करण्यात येत आहे. सांगवी परिसरातील गणेशभक्तांनी मूर्ती संकलनाला चांगला
प्रतिसाद दिला आहे.
सांगवी येथे विघ्नहर्ता विसर्जन रथामार्फत परिसरातील गणेशमूर्तींचे संकलन करण्यात येत आहे. शनिवारी (दि. 29) दुपारी 4.30 वाजेपर्यंत 678 गणेशमूर्ती संकलित झाल्या होत्या. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी महापालिका प्रशासनाने नदीतीरावरील घाट विसर्जनासाठी बंद ठेवले आहेत. त्यामुळे नागरिकांची गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रथम गैरसोय झाली.
परंतु सामाजिक संस्था, नगरसेवक, सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून प्रभागवार गणेशमूर्ती संकलित करून महापालिकेकडू सुपूर्द करण्यात येणार आहेत. त्यानंतर महापालिका त्या गणेशमूर्तींचे विसर्जन करणार आहे. त्यामुळे सांगवी परिसरातील नागरिकांनी विघ्नहर्ता विसर्जन रथ येथे मूर्ती संकलित केल्या आहेत.