राजगुरुनगर(प्रतिनिधी) – राजगुरुनगर येथे आज साध्या पद्धतीने आणि करोनाचे नियमांचे पालन करून घरगुती गणेश विसर्जन करण्यात आले. अनेक घरगुती गणपतीचे नगर परिषदेने तयार केलेल्या हौदांमध्ये विसर्जन करण्यात आले. त्यानंतर मूर्ती दान करण्यात आल्या. शहरात याला १०० टक्के प्रतिसाद मिळाला.
राजगुरूनगर शहरातील गणपती विसर्जन करण्यासाठी येथील केदारेश्वर मंदिराजवळील भिमानदीत विसर्जन घाट बनविण्यात आला आहे. या परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, रस्त्याच्या मार्गावरील साफसफाई, निर्माल्य कलश, कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली होती. राजगुरुनगरनगर परिषद हद्दीत सात ठिकाणी कुत्रिम तलाव गणपती विसर्जनासाठी तयार करण्यात आले आहेत. मुर्ती दान करायच्या आहेत, त्यासाठी स्वतंत्र ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली. ठिकठिकाणी नगरपरिषदेचे कर्मचारी व पोलीस यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राजगुरूनगर शहरात ठीक-ठिकाणी गणपती विसर्जन हौद करण्यात आले होते तर त्यासोबत निर्माल्य गोळा करण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. घरगुती गणपतीचे सकाळी ९ वाजल्यापासून विसर्जनास सुरुवात झाली. दिवसभरात जवळपास ६ ते ७ हजार गणपतींचे विसर्जन साध्या पद्धतीने करण्यात आले. विसर्जनानंतर मूर्ती दान करण्यात आल्या.
यावर्षी करोना विषाणू संसर्गामुळे नागरिकांनी साध्या पद्धतीने गणपती बाप्पाला निरोप दिला. पारंपरिक वाद्ये यावेळी वाजविण्यात आली नाहीत. सोशल डिस्टन्स व शासनाच्या नियमांची नागरिकांनी अंमलबजावणी केली. पोलीस व नगर परिषदेच्या माध्यमातून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.