पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “घन:श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला…’ या होनाजी बाळा यांनी रचलेल्या अवीट गोडीच्या भूपाळीने संगीत रसिकांची मंगळवारची, धनत्रयोदशीची पहाट सूरमयी झाली. निमित्त होते दैनिक “प्रभात’तर्फे आयोजित “दीपस्वर’ या दिवाळी पहाट मैफिलीचे ! पहाटेच्या धुंद वातावरणात दीपोत्सवाबरोबरच या स्वरांच्या उत्सवात रसिकांनी सुरांची दिवाळीही मनसोक्त अनुभवली.
मुख्य प्रायोजक पुनीत बालन ग्रुप, सहप्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज को-अॉप सोसायटी लि. आणि डिजिटल प्रभात यांच्या सहकार्याने या गानमैफिलीचे आयोजन दि. २९ आॅक्टोबरच्या पहाटे बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे, धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर जुन्या – नव्या गाण्यांचा संगत असलेल्या मैफिलीचा रसिकश्रोत्यांनी मनमुराद आनंद लुटला.
कार्यक्रमातील क्षणचित्रे…
– धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर भक्तिरंगात न्हाली पहाट
– दिव्यांच्या उत्सवात रसिकांनी अनुभवली सुरांची दिवाळी
– स्नेही, आप्तेष्टांच्या उपस्थितीने बालगंधर्व रंगमंदिर परिसर भारावला
– जुन्या – नव्या गाण्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध
– बहारदार निवेदनाला उपस्थितांची भरभरून दाद
“स्वस्ति…श्री गणनायका गजमुखा’ या आरती दीक्षित यांनी गायलेल्या गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर ऋषिकेश रानडे, सन्मिता धापटे – शिंदे, स्वप्नजा लेले, आरती दीक्षित यांनी गायलेल्या भावगीत, भक्तिगीत, युगलगीत आणि लावणी अशा एकापेक्षा एक सरस गाण्यांनी ही सूरपहाट उत्तरोत्तर रंगत गेली. कार्यक्रमात अमन सय्यद, मिहीर भडकमकर, सचिन वाघमारे, नरेंद्र चिपळूणकर,
ऋतुराज कोरे, अमित कुंटे, हेमंत उत्तेकर यांनी वाद्यांची साथसंगत केली आणि प्रत्येक गाण्याचे वैशिष्ट्ये सांगत सिद्धार्थ बेंद्रे यांनी उत्कृष्ट, माहितीपूर्ण निवेदन केले. या सांगीतिक मैफिलीचे सहप्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज को-अॉप सोसायटी लि. चे मान्यवर पदाधिकारी, कर्मचारी, दैनिक “प्रभात’ परिवारातील कर्मचारी, कुटुंबिय, वाचक, हितचिंतक, स्नेही, रसिक- प्रेक्षक आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमात ऋषिकेश रानडे यांनी “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’, “कानडा राजा पंढरीचा’, “धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना’, “बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात’, “पाहिले न मी तुला तू मला न पाहिले’, “मन उधाण वाऱ्याचे..’, “कधी तू रिमझिम झरणारी बरसात…’, “रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते’, “आनंदघना’ ही गाणी सादर केली.
सन्मिता धापटे-शिंदे यांनी “बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’, “केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली’, “सावर रे…सावर रे… उंच उंच झुला’, “रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’ ही गाणी आणि “उगवली शुक्राची चांदणी’ ही लावणी सादर केली.
सोबतच स्वप्नजा लेले यांनी “या सुखांनो या’, “का रे दुरावा का रे अबोला’, “राधा ही विनविते’, “हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता’ ही गाणी आणि “रेशमाच्या रेघांनी… लाल काळ्या धाग्यांनी’ ही लावणी सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. दीक्षित यांनी “आली माझ्या घरी दिवाळी..’ हे गाणे सादर केले.
या शिवाय तिघा गायकांनी “गोमू संगतीनं माझ्या तू येशील का…’, “अश्विनी ये ना…’ “माऊली माऊली रुप तुझे…’ ही युगलगीते सादर केली. यातील काही गाण्यांना “वन्समोअर’ही मिळाला. “माऊली माऊली रूपं तुझे….’ या प्रसिद्ध भक्तिगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
रसिक प्रेक्षकही थिरकले…
“मराठी गाण्यांचा कार्यक्रम आणि लावणी नाही असे होणे शक्यच नाही. यावेळी “रेशमाच्या रेघांनी’, “उगवली शुक्राची चांदणी’ या लावण्या सादर झाल्या. यातील “रेशमाच्या रेघांनी’ या लावणीवर प्रेक्षकातील कल्पना बिका या तरुणीने उत्स्फूर्तपणे ठेका धरला आणि अप्रतिम नृत्य सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. लावणीच्या आधी वाजवलेल्या तालावर श्री तिरुपती नागरी सहकारी पतसंस्थेचे शाळीग्राम राठी यांनी ठेका धरला. दोघांच्याही सादरीकरणाला प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी दाद दिली…