नेवासा : नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे शिनाई देवस्थान यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने नारळी सप्ताह व किर्तन महोत्सव सुरू असून मकरसंक्रांतीच्या दिवशी समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या झालेल्या कीर्तनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.काळ नामाला घाबरतो ही दगडावरची रेघ असून काळाचे भय घालविण्यासाठी जीवनात भगवंतांचे नामचिंतन वाढवा असे आवाहन समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर महाराज यांनी यावेळी बोलताना केले.
शिनाई देवस्थानच्या मागील प्रांगणात झालेल्या किर्तन सोहळयाच्या प्रसंगी शिनाई देवस्थानचे महंत श्री दिगंबरबाबा आराध्य व उत्तराधिकारी ज्योतिषाचार्य महंत श्री.आवेराजजी महाराज यांच्या हस्ते हभप इंदोरीकर महाराजांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. हभप इंदोरीकर महाराजांचे गुरुबंधू हभप लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे,महंत किशोर बाबा आराध्य,महंत सुधाकर बाबा आराध्य, महंत तुषार बाबा नेवासकर,संगीत विशारद किरण शेटे,कैलास महाराज राजगुरू,नवनाथ महाराज गोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना हभप इंदोरीकर महाराज म्हणाले की आपण जीवनात सर्वांना दाबू शकता मात्र काळाला कधीही दाबू शकत नाही. काळाला विकत घेऊ शकत नाही. काळ कोणालाही सोडू शकत नाही मात्र लोक काळाच्या विरोधात वागतात याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. हदयात देव आहे मात्र संतांची सेवा केली तर तो दिसेल,आपल्याकडे ज्ञान असेल तर दुःख येणार नाही,मुलाचा बाप होणे ही भूषणावह बाब नसून आजच्या युगात वैष्णव होणे हा इतिहास झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
जीवनात आईवडील, संत आणि भगवंत हीच प्रेमाची माणसे राहिली असून काळाची भीती घालविण्यासाठी देवाचे नामस्मरण करा. मिळवलेल्या ईस्टेटीचा उपभोग घ्या,रिल्याक्स जीवन जगण्याचा प्रयत्न सर्वांनी करा. विश्वाची आई ज्ञानेश्वरी ही नेवासे येथे जन्माला आली असून तिचे नाव घेतले माया ही मरते अशी ज्ञानेश्वरी जीवनात वाचा ती आत्मसात करा.
गावातील सरपंच व सदस्यांनी शाळांना भेटी देऊन शाळांना मंदिर बनविण्यासाठी प्रयत्न करा,वेळ आल्यावर कोणीच आपले नसते त्यामुळे इतरांचे भोंगे बांधून मरु नका,निर्व्यसनी जीवन जगा, पुढील पिढी वाचवायची असेल तर चांगल्या शाळा बनवा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
गुरुवर्य श्री देवगडच्या बाबांबद्दल बोलताना इंदोरीकर महाराज म्हणाले ककायिक, वाचिक, मानसीक ही तिन्ही तप गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांकडे आहे. बाबांसारखे आत्मज्ञान जगात नाही असे आंतरबाह्य साधू ते असल्याचे गौरोद्गार त्यांनी यावेळी बोलताना काढले. यावेळी झालेल्या किर्तनाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित भाविकांना संभाजीनगर येथील सुभाष जैन व परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.शिनाई देवस्थानचे उत्तराधिकारी महंत आवेराजजी महाराज यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाची आई असलेली ज्ञानेश्वरी जगाला सांगितली,सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली म्हणूनच ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून नेवासेने विश्वाला संजीवनी दिली. ही ज्ञानेश्वरी व तिचे महत्व हे जगात चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार असल्याचे गौरवोद्गार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी यावेळी बोलताना काढले.