बाणेर, बालेवाडीत दुचाकी रॅलीमध्ये तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे – भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 13) प्रभाग क्रमांक 9 मध्ये दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरूणांचा उत्स्फूर्त सहभाग होता. भाजप आणि शिवसेनेचे झेंडे हातात घेऊन, घोषणाबाजी करत तरूणांनी महायुतीची वातावरण निर्मिती केली. यावरून कोथरूड विधानसभा मतदारसंघात पाटील दिवसेंदिवस आपली पकड घट्ट करत असल्याचे दिसून येते.

यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या बालेवाडी येथील कार्यालयापासून ही दुचाकी रॅली सुरू झाली. बालेवाडी गाव, बाणेर गाव, पासपोर्ट भवन, सोमेश्‍वरवाडी, सुतारवाडी, पाषाण गाव, शिवाजी पुतळामार्गे रॅली पुढे मार्गस्थ झाली. सोमेश्‍वर मंदिर येथे रॅलीचा समारोप झाला. यामध्ये तरुणांची संख्या मोठी होती. ठिकठिकाणी फटाक्‍यांची आतषबाजी करून चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करून महिलांनी औक्षण केले.”तरूणांचा एकच निर्धार, अब की बार चंद्रकांत दादाच कोथरूडचे आमदार’ अशी घोषणाबाजी तरूणांनी केली. यावेळी पाषाण भागातील श्री सोमेश्‍वर मंदिरात पाटील यांनी भगवान महादेवाची पूजा करून “मोठ्या मताधिक्‍याने विजय कर’ असे साकडे घातले.

रॅलीमध्ये माजी आमदार विनायक निम्हण, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रकाश बालवडकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर यांच्यासह भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांतीचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

दरम्यान, ही रॅली बाणेर रोडवरून जात असताना गहुंजे स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दरम्यानच्या कसोटीतील खेळ संपवून टीम इंडियाचे खेळाडू बसमधून निघाले होते. यावेळी पाटील यांच्याकडून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी शहर पतित पावन संघटनेकडून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देत सीताराम खाडे, श्रीकांत शिळीमकर, पप्पु टेमघरे, संतोष शेंडगे, शरद देशमुख, राजु मोहोळ, सुनिल मराठे, ज्ञानेश्‍वर साठे, अण्णा बांगर, सोपान फाले रॅलीमध्ये सहभागी झाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.