पुणे – शहरात पुढील आठवड्यात होणाऱ्या “जी-20′ परिषदेसाठी महापालिकेकडून शहर स्वच्छ ठेवण्यासह शहरात पदपथ, चौक, तसेच सार्वजनिक भिंतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे. याची कल्पना असूनही तोंडात तंबाखू आणि गुटख्याचा तोबरा ठेऊन भर रस्त्यात जागा मिळेल तिथे पिचकाऱ्या मारणाऱ्यांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
त्यासाठी प्रमुख चौकांमध्ये स्वतंत्र पथके नेमण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून गेल्या तीन दिवसांत तब्बल 123 पिंकबहाद्दरांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी 1 हजार रूपयांप्रमाणे 1 लाख 23 हजारांचा दंडही वसूल करण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख उपायुक्त आशा राऊत यांनी दिली.
शहर स्वच्छता अभियान आणि जी-20 परिषदेच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेची कामे सुरू आहेत. परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी शहर आकर्षक दिसावे, यासाठी महापालिकेच्या वतीने रस्ते दुभाजक, पदपथांसोबतच सार्वजनिक भिंतींची रंगरंगोटी करण्यात येत आहे.
मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या या कामांवर तंबाखू, गुटखा खाणारे पिचकाऱ्या मारुन पुन्हा ते विद्रुप करत आहेत. जी-20 च्या निमित्ताने महापालिका आयुक्तांपासून पालिकेच्या सर्व विभागाचे अधिकारी शहरात वारंवार फिरत असून, त्यांच्या निदर्शनासही ही बाब आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत थेट महापालिकेच्या उपायुक्त आशा राऊतच पथकासह रस्त्यावर कारवाईसाठी उतरल्या आहेत.
गस्ती पथकांनी मागील तीन दिवसांत शहराच्या विविध भागात फिरून पिंकबहाद्दरांवर कारवाई सुरू केली आहे. पहिल्या दिवशी 23, दुसऱ्या दिवशी 29 तर आज 71 थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी एक हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी दंडासोबत थुंकणाऱ्याकडून ज्या ठिकाणी थुंकला आहे, ती जागा स्वच्छही करून घेण्यात आली असून, महापालिकेच्या या कारवाईचे स्वागत होत आहे.