थुंकीबहाद्दरांचे न्यायालयाने टोचले कान

पुणे – शिवाजीनगर येथील सत्र न्यायालय परिसरात गुटखा, तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन सी. बी. आयचे विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगूरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायाधीशांनी तिघांना चांगलेच फैलावर घेतले. “तुमच्या घरातही तुम्ही असेच थुंकता का’, असा संतप्त सवाल करत “न्यायालयासारख्या पवित्र ठिकाणी थुंकताना काहीच कसे वाटत नाही’, असे म्हणत त्यांचे कान टोचले.

नागरिकांकडून न्यायालय परिसरात तबाखू, गुटखा तत्सम पदार्थ खाऊन थुंकण्यात येत असल्याने इमारतींचे कोपरे लाल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांनी न्यायालयीन परिसरात अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढले होते. न्यायालय आवारात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करता यावी यासाठी पथकही तयार करण्यात आले आहे. या पथकातील ऍड. विकास शिंदे, ऍड. दीप्ती राजपूत, पोलीस हवालदार सुनील शिंदे, श्रेयश साळवी, आशीष पवार आणि आझाद पाटील हे न्यायालयात कारवाईच्या उद्देशाने पाहणी करत असताना राम पांडुरंग मोरे (वय 63, रा. देहू) ही व्यक्‍ती मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत तंबाखू खाऊन थुंकत असल्याचे निदर्शनास आले. तसेच विशाल पंढरी शिंदे (वय-22 रा. औसा, लातूर) आणि प्रशांत दिलीप यादव (वय-33, रा. चिंचवड) यांनाही तंबाखू खाऊन थुंकताना ताब्यात घेतले.

न्यायालय परिसरात अस्वच्छता केल्याचे सिद्ध झाल्यास 3 महिन्यांपर्यंत शिक्षा किंवा 2 हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. गुरुवारी न्यायाधिशांनी न्यायालय परिसरात अस्वच्छता करणाऱ्यांकडून माफीनामा घेऊन सुधारण्याची संधी दिली असली तरी यापुढे न्यायालयात अस्वच्छता करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे.
– ऍड. विकास शिंदे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.