आध्यात्म: गुरू नानक : प्रेम व शांततेचे विद्यापीठ

विलास पंढरी

गुरू नानक देव यांची आज 550वी जयंती जगभर साजरी केली जात आहे. त्यांनी सर्वधर्म समभाव, प्रेम व शांतीचा संदेश दिला आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त..

हिंदू धर्मीय कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपूर वात लावली जाते. कार्तिकी एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही असा वर मागून घेतला. या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे होती. त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्याची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात.

उत्तर भारतात या दिवशी स्कंद मूर्तीची पूजा करतात. दक्षिणेत या दिवशी कृत्तिका महोत्सव असतो. त्यात शिवपूजन केले जाते. या दिवशी भगवान विष्णू यांनी मत्स्यावतार घेतला अशीही धारणा आहे. बौद्ध धर्मियांच्या दृष्टीने या पौर्णिमेला वेगळे महत्त्व आहे. बौद्ध धर्मात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्टशिष्य धम्म सेनापती सारिपुत्राचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय उपासक-उपासिका आठ शीलांचे पालन व उपोसथ व्रत करतात. सर्व लहान थोर धर्मबांधव एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात.
शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी शीख धर्म संस्थापक गुरू नानकदेवांची जयंती असल्याने शीख बांधवांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे.

कर्तारपूर हे त्यांचे स्मृतीस्थळ भारत-पाकने विशेष कॉरिडॉर बनवल्यानंतर विशेष प्रकाशात आले आहे. गुरू नानक देव यांची आज 550 वी जयंती जगभर साजरी केली जात आहे. या निमित्ताने केंद्र सरकारने पाकिस्तान सीमेजवळ सर्व सोयींनी युक्‍त असा खास कॉरिडॉर विकसित केला आहे. शीख बांधवांना नानक जन्मस्थळाला भेट देण्यासाठी वर्षभर ही सुविधा सुरू राहणार आहे. नानक यांचा जन्म पाकिस्तानातील लाहोर जवळील तळवंडी येथे कार्तिक पौर्णिमा, शके 1527ला म्हणजे 1469 साली झाला. या गावाला आता “ननकाना साहिब’ असे म्हटले जाते.

या निमित्ताने जन्मस्थानाला भेट देण्यासाठी पाक सरकारने व्हिजाशिवाय शीख श्रद्धालूंना परवानगी दिली आहे. भारतभर गुरू नानक यांचा जन्म दिन “प्रकाश दिन’ म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. त्यांचा मृत्यू 22 सप्टेंबर 1539 रोजी आताच्या पाकिस्तानमधील कर्तारपूर येथे झाला.तिथे समाधी बांधण्यात आलेली आहे. त्यांच्या पत्नीचे नाव सुलखनी, आईचे नाव तृप्ताजी तर वडिलांचे नाव मेहता कालुजी असे होते. गुरू नानक लहानपणापासूनच धार्मिक व बंडखोर स्वभावाचे आणि क्रांतिकारी विचारांचे होते. सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण देत आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली.

जगभरातील धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या. त्यांनी त्या काळात केवळ भारतभ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियातील मक्‍का-मदिना या मुस्लीम पवित्रस्थळांचीही यात्रा केली होती.इस्लामचा अभ्यास करण्यासाठी अनेक अरब देशांनाही त्यांनी भेटी दिल्या होत्या. त्यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्‍वत मूल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. एकदा बेई नदीत स्नान करीत असताना त्यांना साक्षात्कार झाला. नदीतून बाहेर आल्यावर त्यांनी “आपण सर्वजण मानव आहोत’, असा संदेश दिला. हे जग बनविणारा एकच ईश्‍वर आहे, धर्म हे पवित्र दर्शन आहे, दिखाऊपणा नाही अशी त्यांची धारणा होती. धर्मप्रसारासाठी त्यांनी अनेक केंद्राची साखळी निर्माण केली. त्यांनी नवीन विचारधारेचा प्रचार केला.

शीख धर्मामध्ये दहा गुरू आहेत. या सर्व शीख धर्मगुरूंचे चरित्र हृदयाला भावणारे आणि आपल्याला प्रगती पथावर नेणारे आहे. हे सगळे महान त्यागी होते. मानवता, बंधुभाव आणि सदाचरणाच्या रक्षणासाठी त्यांनी आपले सर्वस्व त्यागले. परमोच्च ज्ञानाचे सार त्यांनी सर्वसामान्य लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत दिले. गुरू नानक देव भक्‍तीबद्दल बोलत. त्यांनी स्वतःला भक्‍तीयोगाला वाहून घेतले होते. ते कर्मयोगीही होते. कर्म करणे हाच मुक्‍तीचा मार्ग आहे, यावर त्यांची श्रद्धा होती. बाह्य घडामोडींमध्ये अडकून ईश्‍वराला विसरू नका. ईश्‍वराचे नामस्मरण करा, अंतर्मुख व्हा, हा संदेश नानकांनी लोकांना दिला.

शीख या शब्दाचा अर्थ म्हणजे शिष्य, जो सतत प्रगतीची, शिकण्याची इच्छा ठेवतो. 15व्या शतकाच्या शेवटी भारतीय उपखंडातील पंजाब प्रदेशात शिख धर्म उदयाला आला. हा जगातील प्रमुख धर्मांतील सर्वांत तरुण धर्म आहे. अनुयायांची संख्या पाहता जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा संघटित धर्म आहे. हे अनुयायी त्यांना गुरू नानकदेव, बाबा नानक किंवा नानक शाह अशा नावांनी संबोधतात.

Leave A Reply

Your email address will not be published.