पाथर्डी – शारदीय नवरात्रोत्सव दरम्यान मोहटा मातेचे दर्शनासाठी देवीभक्त श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर लाखोच्या संख्येने येतात. श्री जगदंबा देवी देवस्थान समितीकडून नवरात्र उत्सवासाठी येणाऱ्या भाविक भक्तासाठी चांगल्या पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, देवीच्या शरणी नतमस्त झाल्यानंतर आत्मिक समाधान लाभते, असे प्रतिपदन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केले.
श्रक्षेत्र मोहटा देवी गडावर माता जगदंबा देवीचे दर्शन घेतल्यानंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, प्रांतधिकारी देवदत्त केकाण, तहसिलदार शाम वाडकर, गट विकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे, माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, विश्वस्त भिमराव पालवे, अजिनाथ आव्हाड, अशोक भगवान दहिफळे, अशोक विक्रम दहिफळे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी मोहटा मंदिर व परिसराची पाहणी केली. मोहटादेवी मंदिर परिसराला लागून असलेली वन विभागाची जागा देवस्थान समितीला वन विभागाकडून घटस्थापनेच्या दिवशी देण्यात आली. मिळालेल्या जागेची पाहणी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केली.
या जमिनीसाठी गेल्या24 वर्षांपासून देवस्थान समितीचा पाठपुरावा सुरू होता. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी या जमीन मिळवण्यासाठी शेवटच्या टप्प्यात विशेष लक्ष घातले होते. मंगळवारी सकाळची आरती विश्वस्त अजिनाथ आव्हाड तर रात्रीची आरती उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे यांच्या हस्ते झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, जनाबाई घोडके उपस्थित होते.स्वागत देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी केले.
देवीच्या मूर्तीवर सोन्याच्या छत्रीचा मनोदय
नवरात्र उत्सव काळात दर्शनासाठी आलेल्या एका भक्ताने नाव गुप्त ठेवण्याचे सांगून देवीच्या मूर्तीवर एक किलो वजनाची सोन्याची छत्री दान देण्याचा मनोदय व्यक्त केल्याची माहिती मुख्याधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.