क्रिकेट काॅर्नर : लंबी रेस का घोडा

– अमित डोंगरे

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला एक अफाट गुणवत्ता असलेला डावखुरा फिरकी गोलंदाज मिळाला. त्याच्या गोलंदाजीसमोर पाहुण्या संघाची फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. तिसरी कसोटी त्याने भारतीय संघाला जिंकून देत तब्बल 27 गडी बाद करण्याची किमया केली आहे.

अक्‍सर पटेल या नवोदित परंतू गुणवान गोलंदाजाने भारतीय संघाचे दार केवल वाजवलेच नाही तर ढकलले असेच म्हणावे लागेल. संघात रवीचंद्रन अश्‍विन, एकदा कुलदीप यादव तर एकदा वॉशिंग्टन सुंदर असतानाही कर्णधार विराट कोहलीने पटेलला संधी दिली. या संधीचे त्याने सोने केले. चेन्नईवरून जेव्हा भारतीय संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला तेव्हा या मालिकेत दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी होती. तिसरा सामना दिवस-रात्र गुलाबी चेंडूवर खेळवला गेला. यात भारतीय संघाने अक्‍सर व रवीचंद्रन अश्‍विनच्या फिरकीच्या जोरावर सहज जिंकत 2-1 अशी आघाडी घेतली.

हा सामना अक्‍सर व अश्‍विन या दोघांच्याही फिरकीवर भारताने जिंकला. मात्र, त्यात अक्‍सरच सरस ठरला. या गोलंदाजाकडे काही मूलभूत गुण आहेत. सध्या संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्री यांच्याप्रमाणेच अक्‍सरही डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. तसेच त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवण्यासाठी आपल्या गोलंदाजीच्या भात्यात काही अस्त्रे सज्ज केली आहेत.

एकतर तो उंच असल्याने त्याचे फास्टर वन, स्लोअर वन, फ्लिपर, रॉंग वन अन्य गोलंदाजांपेक्षा वेगवान असतात. म्हणूनच कदाचित यष्टीरक्षक त्याला वासिम भाई (वासिम अक्रम) या टोपण नावाने हाक मारताना दिसतो. अर्थात अक्रम वेगवान गोलंदाज होता पण अक्‍सरची तिसऱ्या कसोटीतील गोलंदाजी व त्याचा वेग पाहिल्यास पंत त्याला वासिम भाई का म्हणतो याचा उलगडा होतो.

हरभजनसिंग भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर अश्‍विनला संधी मिळाली. तेव्हा सचिन तेंडुलकर म्हणाला होता की, हा गोलंदाज पुढील अनेक वर्षे भारतीय संघात दिसेल. आज तोच विश्‍वास अक्‍सरच्या बाबतीत खुद्द विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी व्यक्त केला आहे. केवळ गावसकरच नव्हे तर इंग्लंडचा माजी कसोटीपटू केवीन पीटरसन यानेही त्याच्या भारतीय संघातील स्थानाबाबत अनुकूल मत व्यक्त केले आहे.

अक्‍सरकडे आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे त्याच्यात फलंदाजी करण्याची क्षमता आहे. ही क्षमता त्याने मुंबई इंडियन्सकडून आयपीएल स्पर्धेत खेळतानाही दाखवून दिली. त्यामुळेच त्याची कसोटी संघात वर्णी लागली. भारतीय संघाचे प्रमुख फलंदाज बाद होताना तळात अश्‍विन, पंत, वॉशिंग्टन सुंदर यांच्यासह अक्‍सरनेही उपयुक्त फलंदाज म्हणून आश्‍वस्त केले असल्याने आता संघाची फलंदाजी नवव्या क्रमांकापर्यंत पोहोचली आहे.

अर्थात सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत याच शेपटाने फार धावा केल्या नसल्या तरीही त्यांच्याकडे ती क्षमता निश्‍चितच आहे. येत्या काळात रवी शास्त्रींप्रमाणे अक्‍सरही “लंबी रेस का घोडा’ ठरेल असा विश्‍वास वाटतो. यासाठी त्याला मेहनतही खूप घ्यावी लागणार आहे. कारण कोणा खेळाडूशी बरोबरी केली गेली की त्या खेळाडूची जबाबदारी वाढते. हेच आता अक्‍सरला येत्या काळात सिद्ध करावे लागणार आहे. त्याच्याकडे गुणवत्ता, जिगर आणि जिद्द आहे. त्याचबरोबर कर्णधाराचाही त्याच्यावर विश्‍वास आहे. आता गरज आहे ती स्वतःला सातत्याने सिद्ध करण्याची. ते काम अक्‍सर निश्‍चितच करेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.