पाठीचा कणा – आत्मविश्‍वासाचे प्रतिक 

डॉ. नीता पद्मावत

चांगल्या आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वास सर्वप्रथम आवश्‍यक असणारी गोष्ट म्हणजे आत्मविश्‍वास. हा प्रतीत होण्यासाठी मान आणि पाठ दोन्ही सरळ आणि ताठ असणे फार महत्त्वाचे, ही बाब शास्त्रीय असून त्याची सिद्धाता ऑक्‍टोबर 2009 साली ‘यूरोपीयन जर्नल ऑफ सोशिअल सायकोलॉजी ‘मध्ये दाखवली गेली. अमेरिकन प्रोफेसर रिचर्ड पेटी यांनी 71 विद्यार्थ्यांवर हे संशोधन केले.

माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला उभारी देणारा, आधारस्तंभ, आत्मविश्‍वास दर्शवणारे अंग म्हणजे पाठीचा कणा. हा सरळ असला की चेतातंतूच्या वहनचा मार्ग सुकर होतो. योगशास्त्रात तर याला अनन्य साधारण महत्त्व, सप्तचक्राचे स्थान, कुंडलिनीच्या ऊर्ध्व गमनाचा मार्ग त्यामुळे कदाचित पाठीचा कणा ताठ ठेवण्यामागील उद्देश.

पृथ्वीतलावर मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे, जो दोन पायावर चालतो, पाठीचा कणा जमिनीस लंब, शरीराचा सर्व भार पेलणे तसेच गुरुत्वाकर्षण विरुद्ध काम करून तोल सांभाळणे असे दुहेरी व जिकिरीचे काम पाठीच्या मणक्‍यावर येते. इतर चतुष्पाद प्राण्यांचा कणा जमिनीस समांतर असल्याकारणाने बऱ्यापैकी सुरक्षित असतो.

पाठीच्या कण्याच्या रचनेत एकूण 29 मणक्‍यांचा समावेश होतो. यात मानेमध्ये सात, छातीच्या मागच्या भागात बारा, कंबरेमध्ये पाच आणि माकड हाडाचे पाच मणके एकमेकांशी सांधलेले असतात. त्याच्या खाली तीन ते पाच मणके जुळलेल्या स्थितीत असतात, ज्याला कॉसिकस असे म्हणतात. हा कण्याचा शेवटचा भाग असतो. दोन मणक्‍यांच्या सांध्यामध्ये रबरासारखी एक चकती असते; तिला डिस्क किंवा कुर्चा असंही म्हणतात.

या चकतीमध्ये हादरे व धक्के शोषून घेण्याची क्षमता असते. यामुळेच धावताना, उड्या मारताना बसणारे धक्के सहज सहन केले जातात. कण्यामध्ये असलेल्या मज्जारज्जूला चहूबाजूंनी सुरक्षित ठेवण्याचे काम एखाद्या कवचाप्रमाणे पाठीचा कणा करतो. शरीरातील प्रत्येक महत्त्वाच्या अवयवांना अशी कवचे असतात जसे मेंदूसाठी कवटी आणि हृदयासाठी बरगड्या. प्राचीन काळापासून मनुष्य जन्म हा पुण्य कर्माची फळ मनाली जातात, कारण मानवी शरीरातील पाठीचा कणाच फक्त अध्यात्मिक प्रगतीचे वाहक आहे. योग मनुष्याला सकारात्मक चिंतनाचा मार्ग दाखवतो, ही एक जीवनशैली, पूर्ण विज्ञान व परिपूर्ण चिकित्सा पद्धती आहे.

लवचिक मेरुदंड हे तारुण्याचे मापक आहे. धनुरासन, हलासन, मार्जरासन, चक्रासन यासारखी योगासने मेरूदंड लवचिक बनवतात, पाठीच्या स्नायूंना बळकटी देतात. पाठीच्या मणक्‍यातील मानेतील माणके सर्वात अधिक हालचाल करणारे आहे त्यामुळे मानेच्या स्नायूंची व हाडाची झीज लवकर होणे साहजिक आहे, मानदुःखीचा परिणाम खांदे, पाठ, हात, बोटे, डोळे, छाती येथवर होतो. मारीचासन, वक्रासन, मकरासन जेष्टीकासन, भुजंगासन इ. योगाभ्यासाने सर्वायकल स्पॉन्डीलॉसिस वर सहज मात करता येईल.

उदरपोकळीच्या (लंबर) मणक्‍यांतून जाणारे चेतातंतू पायांवर नियंत्रण ठेवतात, वाढत्या वायासोबत येथील कुर्चा झीजतात, काही बाह्य आघातामुळे तसेच चुकीचं उठण्या-बसण्याच्या पद्धतीमुळे, यांच्यामधे असणारी रबरासारखी गादी आपली जागा सोडून पुढे सरकते, चेतातंतू दाबले गेल्यामुळे पायांचे स्नायू व सांधे यांच्या हालचालीला खीळ बसते, कंबरदुःखीसारखे त्रास उद्‌भवतात. मेरूवक्रासन, शलभासन, नौकासन, उष्ट्रासनासारख्या योगाभ्याने सरकलेली चकती जागेवर येण्यास मदत होते. योगाभ्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाद्वारेच व्हावा, टी व्ही, व्हिडीओ किंवा पुस्तक वाचून केल्यास जास्त हानी होण्याची संभावना असते. कारण योग फक्त व्यायाम प्रकार नसून शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक उत्क्रांतीसाठी आवश्‍यक अशी एक वेगळ्याच प्रकारची ब्रह्मविद्या आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)