राजू मिसाळ : करोना योद्ध्यांच्या वेतनावरून राजकारण शिगेला
पिंपरी – राज्य सरकारने आर्थिक अडचणीत असताना सुध्दा जम्बो रुग्णालयास निधी उपलब्ध करुन दिला आहे. तांत्रिक बाबींमुळे वेतनास विलंब झाला असावा. पालक मंत्री लवकरच याची दखल घेतील. परंतु पालिकेतील सत्ताधारी शहरामध्ये ज्यांच्यामुळे सत्ता आली त्यांच्या जीवासाठी खर्च करायला तयार नाहीत. शहरातील नागरिकांसाठी जम्बो कोविड रुग्णालय असल्याने सत्ताधाऱ्यांनी ही जबाबदारी झटकू नये, असा सल्ला विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी दिला आहे.
जम्बो रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यावर महापौर माई ढोरे यांनी त्यांची भेट घेत पालकमंत्र्यांमुळे जम्बो रुग्णालयाचे वाभाडे निघत असल्याची टीका केली. त्या टीकेला उत्तर देताना महापालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनीही सत्ताधारी भाजपवर टीका केली. त्यामुळे जम्बो रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या पगारावरून महापालिकेत चांगलेच रण पेटले आहे.
राजू मिसाळ म्हणाले, शहरातील रूग्णांसाठी व उपचारांसाठी नियोजन कशा पद्धतीचे असावे याचे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जून महिन्यात देण्यात आले. त्यामध्ये आमच्या वतीने शहरात सर्व प्रकारची जबाबदारी घेण्यासाठी तयारीसुद्धा दाखविली. परंतु नागरिकांचा जीव कमी किमंतीचा वाटला व त्यासाठी शासनाने खर्च दिला नाही म्हणून स्वतःची जबाबदारी झटकून इतरांना नावे ठेवणे स्वतःला सुसंस्कृत म्हणणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शोभत नसल्याची टीका मिसाळ यांनी केली आहे.
भाजपच्या आमदारांनी किती खर्च केला.
जम्बो करोना सेंटरमध्ये 50 टक्के शासन, 25 टक्के पुणे मनपा, 15 टक्के पिंपरी-चिंचवड महापालिका, 10 टक्के जिल्हा नियोजन समिती या प्रमाणे खर्च देण्यात येतो. यातील आपल्या महापालिकेने आजपर्यंत किती पैसे दिले व किती बाकी आहे हे तपासून घ्या. राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांच्या निधीतून कोविड साठी 45 लाख रुपये दिले आहेत. भाजपच्या आमदारांनी किती दिले याचे उत्तर आजपर्यंत दिले नाही, असा टोलाही मिसाळ यांनी लगावला.